Surabhi Jayashree Jagdish
चहा आणि कॉफीमध्ये कॅफिन असते ज्याचा काही लोकांच्या डोकेदुखीवर किंवा मायग्रेनच्या वेदनांवर तात्पुरता परिणाम होऊ शकतो. त्यामुळे काही वेदनाशामक औषधांमध्ये कॅफिनचा वापर केला जातो. मात्र डोकेदुखी झाली की प्रत्येक वेळी चहा किंवा कॉफी घेणं हा सर्वांसाठी योग्य उपाय आहे असं नाही.
दिवसभरात वारंवार चहा किंवा कॉफी घेण्याची सवय असल्यास कॅफिनचं प्रमाण वाढू शकतं. काही लोकांमध्ये कॅफिन हेच डोकेदुखी किंवा मायग्रेनचं ट्रिगर ठरू शकतं. त्यामुळे डोकेदुखी कमी करण्यासाठी सतत कॉफी किंवा चहाचं प्रमाण वाढवणं योग्य नाही.
नियमितपणे कॅफिन घेणाऱ्या व्यक्तीने ते अचानक बंद केलं तर काही वेळा कॅफिनच्या कमतरतेशी संबंधित डोकेदुखी होऊ शकते. विशेषतः रोज मोठ्या प्रमाणात चहा किंवा कॉफी घेण्याची सवय असल्यास हा त्रास जाणवू शकतो.
डोकेदुखीच्या वेळी सर्वप्रथम पुरेसं पाणी पिण्याकडे लक्ष द्यावं कारण शरीरातील पाण्याची कमतरता हे डोकेदुखीचे एक सामान्य कारण आहे. काही काळ शांत वातावरणात आराम करणं आणि पुरेशी झोप घेणंही उपयोगी ठरतं.
डोकेदुखी होत असताना बराच वेळ उपाशी राहणं महत्त्वाचं आहे. नियमित आहार न घेणं हे देखील डोकेदुखीचं एक कारण ठरू शकतं त्यामुळे वेळेवर जेवण करणं आवश्यक आहे. चहा किंवा कॉफीच्या कपावर अवलंबून राहण्यापेक्षा शरीराला आवश्यक पाणी, आहार आणि विश्रांती मिळते आहे का, याकडे आधी लक्ष द्यावं.
डोकेदुखी वारंवार होत असेल किंवा स्वतःहून केलेल्या उपायांनंतरही ती कमी होत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे. डोकेदुखीसाठी पेनकिलर औषधं वारंवार घेण्याची सवयही टाळावी कारण अतिप्रमाणात काही वेदनाशामक औषधांचा वापर केल्याने डोकेदुखीचा त्रास कायम राहू शकतो.
डोकेदुखी अचानक सुरू होऊन अतिशय तीव्र असेल किंवा त्यासोबत मानेत ताठरपणा, उच्च ताप, वारंवार उलट्या, गोंधळ, बोलण्यात अडचण, शरीराच्या एका बाजूला अशक्तपणा किंवा दृष्टी कमी होणं अशी लक्षणं दिसली तर तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी.
ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.