ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील चौथा सामना मँचेस्टर येथे सुरू आहे, भारताचा कर्णधार शुभमन गिलने ओल्ड ट्रॅफर्ड येथे इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात दमदार शतक झळकावले आहे.
इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेत गिलने २२८ व्या चेंडूवर आपले चौथे शतक झळाकावले.
३५ वर्षांनंतर मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड येथे एका भारतीय फलंदाजाने शतक झळकावले आहे. याआधी सचिन तेंडुलकरने १९९० मध्ये या मैदानावर शतक झळकावले होते.
गिल हा भारतासाठी एकाच कसोटी मालिकेत सर्वाधिक शतके करणारा खेळाडू बनला आहे. त्याने गावस्कर आणि विराट कोहली यांच्याशी बरोबरी केली आहे. स्टार फलंदाज कोहलीने २०१४/१५ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यात एकाच कसोटी मालिकेत चार शतके ठोकली होती.
कर्णधार म्हणून कसोटी मालिकेत सर्वाधिक शतके करणारा शुभमन गिल आता जगातील तिसरा खेळाडू बनला आहे.
गिलने सर डॉन ब्रॅडमन आणि सुनील गावस्कर यांच्या रेकॉर्डशी बरोबरी केली आहे. सर डॉन ब्रॅडमन यांनी भारताविरुद्ध कर्णधार म्हणून चार शतके झळकावली होती. तर,भारताच्या सुनील गावस्कर यांनी कर्णधार म्हणून वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत चार शतके झळकावली होती.
इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेत ७०० पेक्षा जास्त धावा करणारा गिल हा पहिला आशियाई खेळाडू आहे.