Surabhi Jayashree Jagdish
नाशिक जिल्ह्यातील सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेलं इगतपुरी हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. नाशिकपासून सुमारे ४५ किमी अंतरावर असलेलं हे ठिकाण आहे. विकेंडला फिरण्यासाठी आणि निसर्ग अनुभवण्यासाठी इगतपुरी हे पर्यटकांचं आवडतं ठिकाण मानलं जातं.
इगतपुरी मुंबईपासून सुमारे १२०–१३० किमी अंतरावर आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे ६०० मीटर उंचीवर असल्यामुळे याठिकाणी हवामान थंड असतं.
या परिसरात घनदाट जंगल, धुक्याने वेढलेले डोंगर आणि अनेक धबधबे पाहायला मिळतात.
विशेषतः पावसाळ्यात संपूर्ण परिसर हिरवागार होऊन अतिशय सुंदर दिसतो. थंड व शांत वातावरणामुळे हे ठिकाण निसर्गप्रेमींसाठी खास आकर्षण आहे.
इगतपुरी परिसरात त्रिंगलवाडी किल्ला, भातसा नदी व्हॅली आणि भवल्ली धरण ही प्रमुख पर्यटनस्थळं आहेत. याठिकाणि किल्ले, टेकड्या इतिहास आणि निसर्गाचा अनोखा संगम पाहायला मिळतो.
सह्याद्रीच्या उंच डोंगरांमुळे इगतपुरी ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहे. याठिकाणी जवळच कळसुबाई शिखर आणि अनेक किल्ल्यांवर ट्रेकिंग करता येतं. रॉक क्लायंबिंग आणि अॅडव्हेंचर उपक्रमांसाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे.
इगतपुरीमध्ये जगप्रसिद्ध विपश्यना आंतरराष्ट्रीय ध्यान केंद्र आहे. याठिकाणी प्राचीन ध्यानपद्धतीचं प्रशिक्षण दिलं जातं. जगभरातून लोकं इथे येतात. शांत वातावरणामुळे ध्यान आणि मानसिक शांतीसाठी हे ठिकाण आदर्श मानलं जातं.
इगतपुरीला तुम्ही रस्ता किंवा ट्रेनने पोहोचू शकता. मुंबई–आग्रा राष्ट्रीय महामार्गावरून कार किंवा बसने सहज पोहोचता येतं. इगतपुरी रेल्वे स्टेशनवर मुंबई, नाशिक आणि पुणे अनेक गाड्या थांबतात.