Surabhi Jayashree Jagdish
अनेक देशांमध्ये एकूण पोटाच्या कॅन्सरचं प्रमाण पूर्वीपेक्षा कमी झालं असलं तरी काही वयोगटांमध्ये आणि काही प्रकारच्या पोटाच्या कॅन्सरच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचं दिसून आलंय. यामागे काही कारणं आहेत.
Helicobacter pylori (एच. पायलोरी) या जीवाणूचा संसर्ग हे पोटाच्या कॅन्सरचे सर्वात महत्त्वाचं कारण मानलं जातं. याशिवाय जास्त मीठ असलेले, प्रक्रिया केलेलं अन्न वारंवार खाणं, धूम्रपान, मद्यपान, लठ्ठपणा आणि आनुवंशिक कारणं यामुळे धोका वाढू शकतो.
सतत अपचन होणं किंवा थोडेसं जेवल्यानंतर पोट भरल्यासारखं वाटणं हे सुरुवातीचं लक्षण असू शकतं. अनेकजण याला गॅस किंवा अॅसिडिटी समजून दुर्लक्ष करतात. ही समस्या काही आठवड्यांपेक्षा जास्त काळ कायम राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
पूर्वीपेक्षा भूक कमी लागणं किंवा काही घास खाल्ल्यानंतरच पोट भरल्याची भावना निर्माण होणं हेही महत्त्वाचं संकेत आहेत. अनेकदा लोक याकडे डाएट किंवा ताणतणावाचा परिणाम म्हणून पाहतात.
आहार किंवा व्यायामात कोणताही बदल न करता वजन झपाट्याने कमी होणं हे गंभीर लक्षण असू शकतं. शरीरातील कॅन्सर पेशी ऊर्जेचा जास्त वापर करतात, त्यामुळे वजन घटू शकतं.
वरच्या पोटात सतत वेदना, जळजळ किंवा अस्वस्थता जाणवत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. अनेकजण ही समस्या अॅसिडिटी किंवा साधे पोटदुखी समजून उपचार टाळतात. मात्र लक्षणं सतत टिकून राहिल्यास एंडोस्कोपीसारख्या तपासण्या आवश्यक ठरू शकतात.
वारंवार मळमळ होणं, उलटी होणं ही पोटातील रक्तस्रावाची लक्षणं असू शकतात. ही लक्षणं पोटाच्या कॅन्सरसह इतर गंभीर आजारांमध्ये देखील आढळू शकतात. त्यामुळे अशी कोणतीही लक्षणं दिसल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.