Surabhi Jayashree Jagdish
शरीरात साखरेचं प्रमाण वाढणं ही केवळ डायबेटीजची सुरुवात नसून अनेक आरोग्याच्या समस्यांचे संकेत असू शकतात. सुरुवातीला काही सामान्य वाटणारी लक्षणं दिसतात, पण त्याकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात.
सततचा थकवा, तहान किंवा त्वचेतील बदल हे शरीर देत असलेले इशारे असतात. त्यामुळे वेळेवर ही लक्षणं ओळखून जीवनशैलीत बदल करणं खूप महत्त्वाचं ठरतं. ही लक्षणं काय आहेत ती पाहूयात.
शरीरात साखरेचं प्रमाण वाढलं की, किडनी अतिरिक्त साखर बाहेर टाकण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे वारंवार लघवी होते आणि शरीरातील पाणी कमी झाल्याने सतत तहान लागते. हे लक्षण दीर्घकाळ दिसत असेल तर रक्तातील साखर तपासणं गरजेचं आहे.
रक्तात साखर जास्त असली तरी शरीराला योग्य ऊर्जा मिळत नाही. त्यामुळे थोडं काम केलं तरी थकवा आणि कमजोरी जाणवते. पुरेशी झोप घेतल्यानंतरही थकवा कायम राहत असेल तर तुमच्या शरीरात साखरचे प्रमाण वाढल्याचे संकेत असतात.
शरीराला आवश्यक ऊर्जा न मिळाल्यास ते स्नायू आणि फॅट्सचा वापर करतं. त्यामुळे कोणताही विशेष डाएट किंवा व्यायाम न करता वजन कमी होऊ शकतं. हे लक्षण विशेषतः मधुमेहाच्या सुरुवातीच्या टप्प्यात दिसून येतं.
रक्तातील साखरेचं प्रमाण वाढल्याने रक्तप्रवाह आणि शरीराच्या इम्युनिटीवर परिणाम होतो. त्यामुळे छोटी जखम किंवा खरचटलेली जागा भरून यायला जास्त वेळ लागतो. अशावेळी रूग्णााला वारंवार इन्फेक्शन देखील होण्याचा धोका असतो.
शरीरातील जास्त साखरेचा परिणाम डोळ्यांवरही होऊ शकतो. त्यामुळे दृष्टी धूसर होऊ शकते. यामध्ये रूग्णाला स्पष्ट दिसण्यात अडचण येऊ शकते. वेळेवर उपचार न घेतल्यास डोळ्यांचं नुकसान होण्याचा धोका वाढतो.