Surabhi Jayashree Jagdish
चुकीचा आहार, जास्त प्रमाणात मद्यपान, तळलेले पदार्थ, लठ्ठपणा, हेपेटायटीस, दीर्घकाळ औषधांचं सेवन आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे लिव्हरच्या कार्यात बिघाड होतो. लिव्हर हा शरीरातील महत्त्वाचा अवयव असल्याने त्याची काळजी घेणं गरजेचं आहे.
ज्यावेळी लिव्हर खराब होण्याच्या मार्गावर असतं तेव्हा शरीर आपल्याला काही संकेत देत असतं. हे संकेत नेमके काय आहेत ते जाणून घेऊया.
लिव्हरच्या कार्यात अडथळा आल्यावर शरीरातील टॉक्सिन घटक व्यवस्थित बाहेर पडत नाहीत. त्यामुळे मेहनत न करता देखील थकवा जाणवतो.
लिव्हर खराब होण्याचं सुरुवातीचं लक्षण म्हणजे भूक न लागणं. थोडं खाल्लं तरी पोट भरल्यासारखं वाटतं. हळूहळू खाण्याची इच्छा कमी होऊ लागते.
लिव्हर नीट काम करत नसेल तर पचन बिघडतं. अशा वेळी सकाळी किंवा जेवणानंतर मळमळ, उलटीसारखं वाटू लागतं. या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये.
लिव्हरमध्ये सूज आल्यावर पोटाच्या उजव्या बाजूला जडपणा किंवा हलका त्रास जाणवतो. लोक हे अनेकदा गॅस समजून दुर्लक्ष करतात. पण हे लिव्हर खराब होण्याचं महत्त्वाचं लक्षण असतं.
लिव्हर खराब झाल्यावर बिलीरुबिन वाढतं. याचा परिणाम त्वचा आणि डोळ्यांवर दिसून येतो. त्यामुळे हलका पिवळेपणा जाणवू लागतो.