Surabhi Jayashree Jagdish
किडनी रक्त फिल्टर करून त्यातील टाकाऊ पदार्थ वेगळे करते आणि ते लघवीच्या माध्यमातून शरीरातून बाहेर काढते. शरीरातील पाणी, सोडियम आणि पोटॅशियमसारख्या इलेक्ट्रोलाइट्सचं संतुलन राखण्यातही किडनीची महत्त्वाची भूमिका असते.
किडनीची फिल्टर कऱण्याची क्षमता कमी झाल्यास शरीरातील अतिरिक्त द्रव आणि काही टाकाऊ पदार्थ पुरेशा प्रमाणात बाहेर पडत नाहीत. त्यामुळे कालांतराने शरीरात द्रव किंवा इतर घटकांचं असंतुलन निर्माण होऊन विविध तक्रारी जाणवू शकतात.
किडनीच्या कार्यात बिघाड झाल्यास लघवीच्या सवयींमध्ये बदल जाणवू शकतात. रात्री नेहमीपेक्षा जास्त वेळा लघवीला उठणं किंवा लघवीच्या स्वरूपात बदल दिसणं याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मात्र लघवीतील प्रत्येक बदल हा किडनीच्या आजाराचं लक्षण असतंच असं नाही.
किडनीचं कार्य लक्षणीयरीत्या कमी झाल्यावर शरीरात टाकाऊ पदार्थ साचणं यामुळे थकवा जाणवू शकतो. नेहमीची कामं करतानाही पूर्वीपेक्षा जास्त दमल्यासारखं वाटणं किंवा सतत अशक्तपणा जाणवणे हा शरीरातील बदलांकडे लक्ष देण्याचा संकेत असू शकतो.
किडनीच्या कार्यात बिघाड झाला की काही व्यक्तींना मळमळ किंवा उलट्यांचा त्रास होऊ शकतो. यासोबत भूक कमी होणं किंवा खाण्याची इच्छा कमी होणं असे बदलही काही रुग्णांमध्ये दिसू शकतात.
किडनीच्या कार्यात मोठी घट झाल्यास शरीरातील काही खनिजं आणि टाकाऊ पदार्थांचं संतुलन बिघडू शकतं. त्यामुळे काही व्यक्तींना त्वचेवर कोरडेपणा किंवा सतत खाज येण्याची समस्या जाणवू शकते. त्वचेची खाज अनेक कारणांमुळे होऊ शकत असल्याने केवळ या लक्षणावरून किडनीचा आजार असल्याचं निश्चित करता येत नाही.
सकाळी उठल्यानंतर डोळ्यांभोवती किंवा चेहऱ्यावर वारंवार सूज दिसत असेल तर या बदलाकडे दुर्लक्ष करू नका. किडनीच्या कार्यात बिघाड झाल्यास अतिरिक्त सोडियम आणि द्रव शरीरातून बाहेर टाकण्यात अडचण येऊ शकते आणि त्यामुळे शरीराच्या काही भागांमध्ये सूज दिसू शकते.
ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.