Surabhi Jayashree Jagdish
हृदय हे शरीरातील सर्वात महत्त्वाच्या अवयवांपैकी एक आहे. हृदयाच्या माध्यमातून संपूर्ण शरीरात रक्तपुरवठा होत असतो. ज्यावेळी हृदय कमकुवत होऊ लागतं तेव्हा त्याचा परिणाम शरीराच्या अनेक भागांवर दिसून येतो.
ज्यावेळी आपलं हृदय कमकुवत होतं तेव्हा हातांमध्ये काही बदल दिसू शकतात. या बदलांकडे अनेकदा दुर्लक्ष केलं जातं. योग्य वेळी ही लक्षणं ओळखल्यास गंभीर हॉर्ट अटॅकचा धोका कमी करण्यास मदत होऊ शकते.
हृदय कमजोर झाल्यावर शरीरात रक्तप्रवाह योग्य प्रमाणात पोहोचत नाही. त्यामुळे हात नेहमी थंड वाटू शकतात. विशेषतः हातांची बोटं थंड पडणं किंवा स्पर्शाला गार वाटणं हे रक्ताभिसरण कमी झाल्याचे संकेत असू शकतात.
कमकुवत हृदयामुळे स्नायूंना पुरेसा ऑक्सिजनयुक्त रक्तपुरवठा होत नाही त्यामुळे हातांमध्ये कमजोरी जाणवू शकते. साधी कामं करतानाही हात दुखणं किंवा वस्तू घट्ट पकडता न येणं अशी लक्षणं दिसू शकतात.
दीर्घकाळ उच्च रक्तदाब राहिल्यास हृदयावर सतत जास्त ताण येतो. त्यामुळे हृदयाच्या स्नायूंना अधिक मेहनत घ्यावी लागते आणि कालांतराने ते कमजोर होऊ शकतं. योग्य वेळी रक्तदाब नियंत्रणात न ठेवल्यास हार्ट फेल्युअरचा धोका वाढू शकतो.
अति तेलकट अन्न, व्यायामाचा अभाव आणि धूम्रपान यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. यामुळे हृदयाला योग्य प्रमाणात ऑक्सिजन मिळत नाही आणि त्याची कार्यक्षमता कमी होऊ लागते.
रक्तातील साखरेचं प्रमाण वाढल्यास रक्तवाहिन्यांचं नुकसान होण्याचा धोका वाढतो. तसंच खराब कोलेस्ट्रॉल वाढल्याने धमन्यांमध्ये चरबी साचते आणि रक्तप्रवाहात अडथळा येऊ शकतो. या दोन्ही स्थितींमुळे हृदयाला अधिक मेहनत घ्यावी लागते.