Surabhi Jayashree Jagdish
हृदय आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवापर्यंत रक्त आणि ऑक्सिजन पोहोचवण्याचं महत्त्वाचं काम करतं. मात्र, हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांमध्ये अडथळा निर्माण झाला तर हार्ट ब्लॉकेजची समस्या उद्भवू शकते. यावेळी कोणती लक्षणं दिसतात ते पाहूयात.
छातीत जळजळ, दडपण जाणवणं हे हार्ट ब्लॉकेजचं सर्वात सामान्य लक्षण असतं. ही वेदना विशेषतः ताणतणाव, धावपळ किंवा जास्त शारीरिक मेहनत घेतल्यानंतर वाढू शकते.
कमी अंतर चालल्यानंतर किंवा जिने चढल्यानंतर श्वास घ्यायला त्रास होणं हे हृदयाशी संबंधित समस्येचं संकेत असू शकतं. हृदयाला पुरेसं रक्त आणि ऑक्सिजन मिळत नसल्यामुळे शरीराला थकवा आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. याचा अर्थ तुमच्या हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यात.
रोजची साधी कामं करतानाही सतत थकवा जाणवत असेल तर ते हार्ट ब्लॉकेजचं सुरुवातीचं लक्षण असू शकतं. शरीराला आवश्यक प्रमाणात ऑक्सिजन न मिळाल्यामुळे ऊर्जा कमी पडू लागते.
हृदयाशी संबंधित वेदना नेहमी छातीतच जाणवतात असं नाही. अनेकदा डाव्या हातात, मानेला, पाठीला किंवा जबड्यात वेदना जाणवू शकतात. लोक ही वेदना सामान्य स्नायू दुखी समजून दुर्लक्ष करतात, पण तो हार्ट ब्लॉकेजचा इशारा असू शकतो.
हृदय अचानक जोरात धडधडू लागणं किंवा ठोके अनियमित होणं हे गंभीर लक्षण असू शकतं. काही लोकांना यासोबत चक्कर येणं किंवा अस्वस्थ वाटण्याची समस्या देखील जाणवते.
कोणतंही जास्त काम न करता अचानक घाम येणं हे हृदयविकाराचे संकेत असू शकतात. काही लोकांना यावेळी छातीत वेदनाही होऊ शकतात. विशेषतः थंड घाम येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये.