Surabhi Jayashree Jagdish
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत आणि चुकीच्या आहारामुळे कोलेस्ट्रॉल वाढण्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात दिसू लागल्या आहेत. सुरुवातीला याकडे दुर्लक्ष केलं जातं पण नंतर यामुळे हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते.
डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, ज्यावेळी शरीर तुम्हाला संकेत देत असतं त्याकडे दुर्लक्ष करू नये. ही लक्षणं नेमकी कोणती आहेत ते पाहूयात.
कोलेस्ट्रॉल वाढल्यावर LDL रक्तवाहिन्यांच्या भिंतींवर साचू लागतो. त्यामुळे रक्तप्रवाह कमी होतो आणि हृदयाला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. यामुळे छातीत दाब, जळजळ किंवा जडपणा जाणवू शकतो. चालताना किंवा जिने चढताना हा त्रास अधिक जाणवतो.
कोणतंही मेहनतीचं काम न करता लवकर थकवा येणं हे देखील हाय कोलेस्ट्रॉलचं लक्षण असू शकतं. रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण झाल्यामुळे शरीराच्या अवयवांना योग्य प्रमाणात ऑक्सिजन आणि पोषण मिळत नाही.
रक्ताभिसरण कमी झाल्यास पायांमध्ये मुंग्या येणं, सुन्नपणा किंवा हलकी वेदना जाणवू शकते. जास्त वेळ बसून राहिल्यावर किंवा चालल्यानंतर हा त्रास वाढतो. हे शरीरातील रक्तप्रवाह बिघडल्याचे स्पष्ट संकेत मानले जातात.
कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे हृदयावर अतिरिक्त ताण येतो. त्यामुळे हलका चालणे किंवा जिने चढणे यांसारख्या कामांमध्येही श्वास लागणे जाणवू शकते.
काही प्रकरणांमध्ये डोळ्यांच्या आसपास पिवळसर किंवा पांढरट डाग दिसू शकतात. याला वैद्यकीय भाषेत झँथोमा म्हटलं जातं. हे शरीरात चरबी साचत असल्याचे बाह्य लक्षण आहे आणि दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते.