Surabhi Jayashree Jagdish
शरीरात अचानक गाठ किंवा सूज दिसणं हे कॅन्सरचं सुरुवातीचं लक्षण असू शकतं.
स्तन, मान, बगल किंवा अंडकोषाजवळ दिसणाऱ्या वेदनारहित गाठींकडे दुर्लक्ष करू नये. लहान गाठ असली तरी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.
तोंडातील जखम किंवा अल्सर दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ बरा होत नसेल तर सावध राहा. भारतात तोंडाचा कॅन्सर मोठ्या प्रमाणावर आढळतो आणि त्यामागे तंबाखूचं सेवन मोठं कारण आहे. जीभ, हिरड्या किंवा तोंडातील कायम राहणाऱ्या जखमा धोक्याचे संकेत असू शकतात.
कोणतेही कारण नसताना रक्तस्राव होणं हे गंभीर लक्षण ठरू शकते. तोंड, लघवी, शौच किंवा योनीमार्गातून रक्त येत असल्यास ते दुर्लक्षित करू नये. अगदी थोडासा रक्तस्राव झाला तरी त्वरित तपासणी करणं गरजेचं आहे.
सतत खोकला येणं, आवाज बसणं किंवा गिळताना त्रास होणं हेही धोकादायक संकेत असू शकतात. अनेक जण हे प्रदूषण किंवा संसर्गामुळे होत असल्याचं समजून दुर्लक्ष करतात. मात्र अशी लक्षणं दोन-तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ राहिल्यास डॉक्टरांकडे जा.
कोणतंही विशेष कारण नसताना वजन झपाट्याने कमी होणं हे कॅन्सरचं लक्षण असू शकतं. तसंच सतत थकवा जाणवणं आणि विश्रांती घेतल्यानंतरही अशक्तपणा न जाणं हेही गंभीर संकेत आहेत. रक्त, फुफ्फुस किंवा पोटाशी संबंधित कॅन्सरमध्ये अशी लक्षणे दिसू शकतात.
कॅन्सरच्या सुरुवातीच्या टप्प्यात अनेकदा वेदना जाणवत नाहीत. यामुळे लोक सगळं ठीक होईल असं समजून उपचार टाळतात. पण वेळेत तपासणी न झाल्यास आजार गंभीर अवस्थेत पोहोचू शकतो.
शरीरात कोणताही असामान्य बदल दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. लवकर निदान झाल्यास कॅन्सरवर उपचार करणं अधिक सोपं आणि प्रभावी ठरते.