Surabhi Jayashree Jagdish
चुकीच्या जीवनशैलीमुळे कॅन्सर होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामध्ये आजकाल हाडांचा कॅन्सरही पाहायला मिळतो. आजकाल अनेक जण हाडांमध्ये होणाऱ्या वेदनांकडे साधा त्रास समजून दुर्लक्ष करतात.
काही वेळा हीच वेदना गंभीर आजाराचे संकेत देऊ शकते. डॉक्टरांच्या मते, हाडांचा कॅन्सर म्हणजेच बोन कॅन्सर सुरुवातीला काही सामान्य लक्षणांमधून शरीरात दिसू लागतो. ही लक्षणं वेळेत ओळखली तर उपचार लवकर सुरू होऊ शकतात.
हाडांचा कॅन्सर झाल्यास सर्वात आधी जाणवणारं लक्षण म्हणजे हाडांमध्ये सतत होणारी वेदना. रात्रीच्या वेळी किंवा व्यायाम करताना ही वेदना अधिक तीव्र जाणवू शकते. पेनकिलर घेतल्यावरही ही वेदना पूर्णपणे कमी होत नाही.
हाड किंवा सांध्याजवळ अचानक सूज येणं हे देखील बोन कॅन्सरच्या सुरुवातीचे लक्षण असू शकतं. काही वेळा त्या भागात गाठ दिसू शकते किंवा स्पर्श केल्यावर दुखू शकतं. वेदना सुरू झाल्यानंतर काही आठवड्यांनी सूज दिसून येते.
हाडांचा कॅन्सर हाडांना आतून कमकुवत बनवू शकतो. त्यामुळे अगदी छोट्या धक्क्याने किंवा किरकोळ पडल्यावरही हाड मोडण्याची शक्यता वाढते. जर एखाद्या व्यक्तीची हाडं वारंवार मोडत असतील तर ते कमजोरीचं लक्षण असू शकतात.
बोन कॅन्सरमुळे शरीरात कायम थकवा जाणवू शकतो. कॅन्सरशी लढताना शरीराची ऊर्जा मोठ्या प्रमाणात खर्च होते. त्यामुळे व्यक्ती सतत अशक्त आणि थकलेली वाटू शकते.
कॅन्सर जर सांध्याजवळील हाडांमध्ये झाला असेल तर हात किंवा पाय हलवताना त्रास होऊ शकतो. त्याचप्रमाणे वस्तू उचलताना किंवा दैनंदिन काम करतानाही वेदना जाणवू शकतात. हळूहळू हालचाली कमी होतात आणि सांध्यांमध्ये कडकपणा येतो.