Surabhi Jayashree Jagdish
आजकाल बदललेली जीवनशैली, सततचा ताण आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे कोलेस्ट्रॉल वाढण्याची समस्या मोठ्या प्रमाणात वाढतेय. शरीरात कोलेस्ट्रॉल वाढत असतानाही सुरुवातीला कोणतीही स्पष्ट लक्षणं जाणवत नाहीत. त्यामुळेच या समस्येला अनेकदा ‘सायलेंट किलर’ असं म्हटलं जातं.
शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जास्त झाल्यावर ते रक्तवाहिन्यांमध्ये प्लाकच्या स्वरूपात जमा होऊ लागतं. त्यामुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात आणि शरीरातील रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो. अशावेळी काही महत्त्वाची लक्षणं दिसू लागतात. ही लक्षणं कोणती आहेत ती पाहूयात.
शरीरात वाढलेल्या कोलेस्ट्रॉलमुळे हृदयाकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्या अरुंद होऊ लागतात. त्यामुळे हृदयाला आवश्यक प्रमाणात ऑक्सिजनयुक्त रक्त पोहोचत नाही. अशावेळी चालताना, जिने चढताना किंवा तणावाच्या परिस्थितीत छातीत जडपणा, दडपण किंवा वेदना जाणवू शकतात.
कोलेस्ट्रॉल वाढल्याचा परिणाम फक्त हृदयावरच नाही तर पायांच्या रक्तवाहिन्यांवरही होतो. या स्थितीला पेरिफेरल आर्टरी डिसीज असं म्हणतात. रक्तप्रवाह व्यवस्थित न झाल्यामुळे चालताना पायात गोळे येणं, वेदना होणं, जडपणा जाणवणं किंवा मुंग्या येणं अशी लक्षणं दिसू शकतात.
शरीरातील रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळे पेशींना आणि स्नायूंना पुरेसा ऑक्सिजन आणि पोषण मिळत नाही. त्यामुळे कोणतंही विशेष कारण नसताना सतत थकवा जाणवू शकतो.
वाढलेल्या कोलेस्ट्रॉलचं आणखी एक स्पष्ट लक्षण म्हणजे डोळ्यांच्या आसपास किंवा पापण्यांवर पिवळसर किंवा नारिंगी रंगाचे छोटे डाग दिसू लागणं. हे प्रत्यक्षात चरबीचे थर असतात. हे डाग सहसा वेदनादायक नसतात.
अशी कोणतीही लक्षणं वारंवार जाणवत असतील तर दुर्लक्ष करू नये. योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घेऊन तपासणी केल्यास गंभीर आजारांचा धोका टाळता येऊ शकतो.