Surabhi Jayashree Jagdish
नियमित व्यायाम न केल्याने लठ्ठपणा, उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा धोका वाढतो. सततचा मानसिक ताण आणि अपुरी झोप यामुळे रक्तदाब वाढू शकतो तसंच हृदयावर अतिरिक्त ताण येतो. त्यामुळे दररोज किमान ३० मिनिटं व्यायाम आणि पुरेशी झोप घेणं हृदयाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचं आहे.
फास्ट फूड, जास्त मीठ, साखर आणि चरबी असलेला आहार हृदयाच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो. अशा आहारामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉल वाढून रक्तवाहिन्यांमध्ये चरबी साचण्याचा धोका वाढतो. परिणामी हृदयाचे आजार होण्याची शक्यता वाढते.
धूम्रपानामुळे रक्तवाहिन्यांचं नुकसान होतं आणि रक्ताच्या गाठी तयार होण्याचा धोका वाढतो. जास्त मद्यपान, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि आनुवंशिक कारणंही हृदयाच्या समस्या वाढवू शकतात. हृदयाच्या समस्यांची नखांवर कोणती लक्षणं दिसून येतात ते पाहूयात.
हृदय व्यवस्थित रक्तपुरवठा करू शकत नसल्यास शरीरात ऑक्सिजनचं प्रमाण कमी होऊ शकतं. अशा वेळी नखांचा रंग निळसर किंवा जांभळट दिसू शकतो. हे एक गंभीर लक्षण मानलं जातं.
नखांच्या टोकांचा आकार फुगल्यासारखा दिसणं आणि नखं खाली वाकल्यासारखी होणं याला क्लबिंग म्हणतात. हे दीर्घकाळ ऑक्सिजनचा पुरवठा कमी राहिल्यास काही हृदयाच्या समस्यांमध्ये दिसू शकतं.
नखं सतत फिकट किंवा पांढरट दिसत असल्यास शरीरातील रक्ताभिसरण कमी असल्याचा किंवा अशक्तपणाचा संकेत असू शकतो. काही हृदयाच्या समस्या शरीराच्या टोकापर्यंत पुरेसा रक्तपुरवठा होत नसल्याने असा बदल दिसू शकतो.
शरीराच्या टोकापर्यंत पुरेसं रक्त आणि पोषण न पोहोचल्यास नखांची वाढ मंदावू शकते. यामुळे नखं तुटण्याचं प्रमाणही वाढतं. याचसोबत जर छातीत दुखणं, श्वास लागणं किंवा थकवा यांसारखी इतर लक्षणंही असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.