Surabhi Jayashree Jagdish
जगभरात सर्वाधिक आढळणाऱ्या कॅन्सरपैकी एक म्हणजे पोटाचा कॅन्सर. पण त्याचं निदान पटकन होत नाही, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. साधं अपचन, पोटात जळजळ किंवा अॅसिडिटीसारखी लक्षणं आपल्याला नेहमीच जाणवतात आणि आपण त्याकडे फारसं लक्ष देत नाही.
पोटाचा कॅन्सर तेव्हा होतो ज्यावेळी पोटात पेशींची अनियंत्रित वाढ सुरू होते. या कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं कोणती असतील हे ट्युमर कुठे आहे आणि कोणत्या टप्प्यावर आहे यावर अवलंबून असतं. ही लक्षणं काय आहेत ते पाहूयात.
जर तुम्हाला अगदी कमी जेवणानंतरही पोट भरल्यासारखं वाटत असेल किंवा सतत जडपणा जाणवत असेल, तर याकडे दुर्लक्ष करू नये. ट्युमरचा आकार वाढल्यामुळे रूग्णाला पोट भरल्यासारखं वाटू लागतं.
पोटाच्या कॅन्सरमध्ये पोट कडक होऊ लागतं. अशावेळी काहीही खाल्ल्यानंतर पोटात अन्न जाण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे सतत फुगल्यासारखं दिसून येऊ शकतं.
कोणत्याही कारणाशिवाय सतत मळमळ होणं किंवा उलट्या होणं हे देखील एक लक्षण असू शकतं. जर पोटाच्या आत गाठ तयार झाली आणि अन्न पचनाचा मार्ग अडला जातो. त्यामुळे उलट्या होऊ शकतात.
शौचाचा रंग खूप गडद, काळपट दिसू लागला तर ते अंतर्गत रक्तस्रावाचं लक्षण असू शकतं. हे लक्षण पोटाच्या कॅन्सरमध्ये फार सामान्य मानलं जात नाही. मात्र वारंवार असं दिसत असेल तर डॉक्टरांची मदत नक्की घ्या.
पोटाच्या कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं खूपच साधी वाटू शकतात. पण ती सतत दिसत राहिली तर त्याकडे दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकतं. अशावेळी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.