Surabhi Jayashree Jagdish
आरोग्याची काळजी घेताना बहुतेक लोक कोलेस्ट्रॉल, रक्तदाब किंवा कौटुंबिक आजारांचा इतिहास यांसारख्या गोष्टींकडे लक्ष देतात. मात्र, दैनंदिन जीवनातील काही साध्यासुध्या वाटणाऱ्या सवयीही हळूहळू हृदयाचं नुकसान करू शकतात.
आपलं हृदय दिवसातून एक लाखाहून अधिक वेळा धडधडत संपूर्ण शरीरात रक्त आणि ऑक्सिजन पोहोचवतं. अशावेळी खाण्यापिण्याच्या सवयी, हालचाल, झोप आणि तणाव यांचा हृदयाच्या आरोग्यावर मोठा परिणाम होत असतो.
आजच्या काळात अनेकांची जीवनशैली आहे. ऑफिसमध्ये लॅपटॉपसमोर काम करणं, घरी टीव्ही पाहणं किंवा मोबाईलवर वेळ घालवणं यामुळे शरीराची हालचाल कमी होते. जास्त वेळ बसून राहिल्याने रक्ताभिसरणावर परिणाम होतो, शरीरात चरबी साठते आणि इन्सुलिनचा प्रभाव कमी होतो.
फास्ट फूड आणि पॅकेज्ड पदार्थ खाणं सोयीचं असलं तरी त्याचा हृदयावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. अशा पदार्थांमध्ये फॅट्स, साखर आणि मीठाचं प्रमाण जास्त असतं. परिणामी वजन वाढणं, कोलेस्ट्रॉल वाढणं आणि रक्तदाबाचा त्रास निर्माण होऊ शकतो.
अनेकजण झोपेकडे दुर्लक्ष करतात. मात्र दररोज सहा तासांपेक्षा कमी झोप घेणं किंवा नीट झोप न लागणं हृदयासाठी धोकादायक ठरू शकतं. अपुऱ्या झोपेमुळे रक्तदाब वाढतो, तणाव निर्माण करणाऱ्या हार्मोन्सचं प्रमाण वाढतं.
अनेक लोक भूक नसतानाही तणाव, चिंता किंवा कंटाळा आल्यामुळे खाण्याकडे वळतात. अशावेळी गोड किंवा तेलकट पदार्थांचं सेवन वाढतं. ज्यामुळे शरीरात अतिरिक्त चरबी साठते आणि कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता असते.
मर्यादित प्रमाणात मद्यपान केल्याने फारसा धोका नसला तरी जास्त प्रमाणात मद्यपान करणं हृदयासाठी हानिकारक ठरू शकते. अति मद्यपानामुळे रक्तदाब वाढतो, हृदयाचं स्नायू कमकुवत होतात आणि हृदयाचे ठोके अनियमित होऊ शकतात.