Surabhi Jayashree Jagdish
तळलेले पदार्थ, स्विट ड्रिंक्स, मैद्याचे पदार्थ आणि जंक फूड यांचं वारंवार सेवन केल्याने शरीरात अतिरिक्त कॅलरी जमा होतात. या अतिरिक्त कॅलरींचं रूपांतर चरबीत होतं आणि ती विशेषतः पोटाभोवती साचते.
दिवसभर बसून काम करणाऱ्या किंवा शारीरिक हालचाल कमी असलेल्या व्यक्तींमध्ये पोटाची चरबी लवकर वाढते. शरीरातील ऊर्जा कमी खर्च झाल्यामुळे अतिरिक्त चरबी साठू लागते. नियमित चालणं, जिने चढणं आणि हलका व्यायाम केल्याने हा धोका कमी होऊ शकतो.
पोटाभोवती जास्त चरबी असल्यास मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हार्ट अटॅकचा धोका वाढतो. कंबरदुखी, श्वास लागणं आणि शरीराची हालचाल कमी होण्यासारख्या समस्या देखील निर्माण होऊ शकतात.
दररोज ३० ते ४५ मिनिटं वेगाने चालल्याने अतिरिक्त कॅलरी खर्च होण्यास मदत होते. यामुळे पोटाभोवतीची चरबी कमी करण्यास आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास फायदा होतो. नियमित चालण्यामुळे हृदयाचं आरोग्यही सुधारते.
डाळी, कडधान्यं, अंडी, दूध, दही आणि भरपूर भाज्या-फळांचा आहारात समावेश करा. प्रोटीन आणि फायबरमुळे पोट जास्त वेळ भरल्यासारखं वाटतं आणि वारंवार भूक लागत नाही. त्यामुळे अनावश्यक खाणं कमी होऊन वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.
साखरयुक्त पेयं, मिठाई, बिस्किटं आणि प्रक्रिया केलेले स्नॅक्स यांचं सेवन शक्य तितकं कमी करा. अशा पदार्थांमुळे पोटाभोवती चरबी वाढण्याची शक्यता अधिक असते. त्याऐवजी ताजी फळं, सुकामेवा आणि घरचे पौष्टिक पदार्थ निवडा.
दररोज ७ ते ८ तासांची चांगली झोप घेतल्याने शरीरातील हार्मोन्सचं संतुलन राखण्यास मदत होते. जास्त ताणतणावामुळे काही हार्मोन्स वाढून पोटाभोवती चरबी साचण्याची शक्यता वाढते. ध्यान, प्राणायाम आणि श्वसनाचे व्यायाम नियमित केल्यास ताण कमी होतो.