Surabhi Jayashree Jagdish
छातीत जळजळ आणि आम्लपित्तासाठी तुम्ही घरच्या घरी उपाय करत असाल तर सावध व्हा. काही वेळ आराम मिळाला तरी नंतर त्रास वाढू शकतो, असा डॉक्टरांचा इशारा आहे. अनेक घरगुती उपाय तात्पुरता दिलासा देतात पण काही उपाय पोटातील पित्ताचं उत्पादन वाढवू शकतात.
अनेकजण छातीत जळजळ, आम्लपित्त किंवा अॅसिड रिफ्लक्स झाल्यावर लगेच घरगुती उपायांचा आधार घेतात. काही उपायांमुळे काही मिनिटं किंवा तासभर आराम मिळाल्यासारखं वाटतं. मात्र काही उपायांचा परिणाम नंतर उलट होऊन पोटातील आम्लाचं प्रमाण वाढू शकतं.
इंटरनल मेडिसिन तज्ज्ञ डॉ. प्रियम बोरदोलोई यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी थंड दूध, कोमट पाण्यातील लिंबूपाणी, केळं आणि आल्याचा चहा हे उपाय प्रत्येकासाठी फायदेशीर असतीलच असं नाही, असं स्पष्ट केलंय.
थंड दूध पोटातील जळजळ काही काळासाठी कमी झाल्यासारखी भावना निर्माण करू शकते. मात्र दुधातील कॅल्शियम आणि प्रोटीन शरीरात 'गॅस्ट्रिन' या हार्मोनचे प्रमाण वाढवू शकतात. त्यामुळे एक-दोन तासांनी पोटात अधिक आम्ल तयार होऊन पुन्हा आम्लपित्त किंवा छातीत जळजळ वाढण्याची शक्यता असते.
गॅस्ट्रिन हे पचनक्रियेसाठी आवश्यक असलेलं हार्मोन आहे. हे हार्मोन पोटाला हायड्रोक्लोरिक आम्ल तयार करण्यास ट्रिगर करतं आणि पचनासाठी आवश्यक एन्झाइम्सच्या निर्मितीवर परिणाम करतं. तसंच अन्न पुढे ढकलण्यासाठी आवश्यक स्नायूंच्या हालचालींनाही ते मदत करतं.
गॅस्ट्रिनचं प्रमाण खूप वाढलं किंवा कमी झालं तर पचनक्रिया विस्कळीत होऊ शकते. अशा परिस्थितीत अॅसिड रिफ्लक्स, वारंवार पित्त आणि काही रुग्णांमध्ये पोटातील अल्सरसारख्या समस्या निर्माण होण्याचा धोका वाढतो.
कोमट पाण्यातील लिंबूपाणी, केळं किंवा आल्याचा चहा काही लोकांना आराम देऊ शकतात. परंतु प्रत्येकाची शारीरिक प्रतिक्रिया वेगळी असते. काही व्यक्तींमध्ये हे पदार्थ आम्लपित्ताची लक्षणं कमी करण्याऐवजी वाढवू शकतात. त्यामुळे एखादा उपाय केल्यानंतर वारंवार त्रास वाढत असल्यास तो उपाय थांबवून डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
आम्लपित्त सतत होत असेल तर केवळ घरगुती उपायांवर अवलंबून राहणं योग्य नाही. संतुलित आहार, वेळेवर जेवण, तेलकट-तिखट पदार्थांचं प्रमाण कमी करणं आणि आवश्यक असल्यास वैद्यकीय तपासणी करणं महत्त्वाचं आहे.
ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.