Surabhi Jayashree Jagdish
टाईप २ डायबेटीस ही एक अशी परिस्थिती आहे ज्यामध्ये शरीरात साखरेची पातळी वाढलेली राहते.
हा आजार हळूहळू विकसित होतो आणि सुरुवातीला त्याची लक्षणं पटकन लक्षात येत नाहीत.
अनेक वेळा लोक ही लक्षणं दुर्लक्षित करतात आणि त्यामुळे आजार उशिरा लक्षात येतो.
टाईप २ डायबेटीस प्रामुख्याने जीवनशैलीशी संबंधित आजार आहे. चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव आणि वाढलेलं वजन ही त्याची प्रमुख कारणं आहेत. त्याचप्रमाणे अनुवांशिक घटक आणि वाढतं वयही या आजाराचा धोका वाढवू शकतात.
टाईप २ डायबेटीजमध्ये शरीरातील साखरेची पातळी वाढते त्यामुळे किडनीवर परिणाम होतो आणि व्यक्तीला वारंवार लघवीला जावं लागतं. ही स्थिती विशेषतः रात्री जास्त जाणवू शकते.
वारंवार लघवी झाल्यामुळे शरीरातील पाणी कमी होतं आणि डिहायड्रेशनची समस्या निर्माण होते. त्यामुळे सतत आणि जास्त तहान लागते. पाणी प्यायल्यानंतरही तहान भागत नाही.
शरीरात इन्सुलिन योग्य प्रकारे कार्यरत नसल्याने ग्लुकोज पेशींमध्ये पोहोचत नाही. त्यामुळे शरीराला ऊर्जा कमी मिळते आणि सतत भूक लागते. जेवण केल्यानंतरही लवकर पुन्हा भूक लागण्याची शक्यता असते.
शरीर ग्लुकोजचा योग्य वापर करू शकत नसल्यामुळे ऊर्जा मिळवण्यासाठी चरबी आणि स्नायू यांचा वापर होतो. त्यामुळे कोणताही प्रयत्न न करता वजन कमी होऊ शकतं. ही स्थिती आरोग्यासाठी धोकादायक संकेत मानला जातो.
रक्तातील साखर योग्य प्रकारे पेशींमध्ये न गेल्यामुळे शरीराला पुरेशी ऊर्जा मिळत नाही. त्यामुळे व्यक्तीला सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवतो. अशावेळी रोजच्या कामांमध्येही उत्साह कमी जाणवतो.