Surabhi Jayashree Jagdish
मधुमेह हा असा आजार आहे ज्यामध्ये शरीरातील रक्तातील साखरेची पातळी सामान्यपेक्षा जास्त वाढते. शरीर पुरेसे इन्सुलिन तयार करत नाही किंवा इन्सुलिनचा योग्य वापर करू शकत नाही, त्यामुळे ही समस्या निर्माण होते.
मधुमेहाच्या सुरुवातीच्या टप्प्यात अनेकांना कोणतीही गंभीर तक्रार जाणवत नाही. मात्र शरीर काही सूक्ष्म संकेत देत असते, जे दुर्लक्षित केल्यास पुढे समस्या वाढू शकते. लवकर निदान झाल्यास जीवनशैलीत बदल करून टाइप-२ मधुमेहाचा धोका कमी करता येतो.
रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यास शरीर अतिरिक्त साखर लघवीद्वारे बाहेर टाकण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे वारंवार लघवी लागते आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन सतत तहान लागते.
शरीरातील पेशींना आवश्यक ऊर्जा मिळत नसल्याने सतत थकवा जाणवू शकतो. पुरेशी झोप घेतल्यानंतरही अशक्तपणा, सुस्ती किंवा कामात लक्ष न लागणं अशी लक्षणं दिसू शकतात. काही लोकांना डोकेदुखी किंवा चिडचिडेपणाही जाणवू शकतो.
ब्लड शुगर वाढल्यास डोळ्यांच्या लेन्समध्ये द्रवपदार्थाचं प्रमाण बदलतं. त्यामुळे काही दिवस किंवा आठवडे दृष्टी धूसर होऊ शकते आणि नंतर पुन्हा सामान्य वाटू शकते. वारंवार असा अनुभव येत असल्यास डोळ्यांसह रक्तातील साखरेची तपासणी करणं गरजेचं आहे.
रक्तातील साखर जास्त असल्यास शरीराची संसर्गांशी लढण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे छोट्या जखमा, खरचटणं किंवा हिरड्यांच्या समस्या बऱ्या होण्यासाठी अधिक वेळ लागू शकतो.
मान, बगल किंवा हाताच्या सांध्यांवर काळसर आणि मखमलीसारखे जाडसर डाग दिसणं हे इन्सुलिन रेझिस्टन्सचं लक्षण असू शकतं. असे बदल दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन ब्लड शुगरची तपासणी करून घेणं योग्य ठरतं.