Surabhi Jayashree Jagdish
जास्त कॅलरीयुक्त आहार, तळलेले पदार्थ, साखरयुक्त पेये आणि नियमित व्यायामाचा अभाव ही फॅटी लिव्हरची प्रमुख कारणं आहेत. लठ्ठपणा, टाइप-२ मधुमेह, उच्च कोलेस्ट्रॉल आणि इन्सुलिन रेझिस्टन्स यामुळेही लिव्हरमध्ये चरबी जमा होण्याचा धोका वाढतो.
सुरुवातीच्या टप्प्यात फॅटी लिव्हर सहसा जीवघेणं नसतं आणि योग्य उपचारांनी तो नियंत्रणात येऊ शकतो. मात्र उपचार न घेतल्यास काही रुग्णांमध्ये लिव्हरला सूज येणं, फायब्रोसिस, सिरोसिस आणि क्वचित प्रसंगी लिव्हर कॅन्सरचा धोका वाढू शकतो.
दररोज किमान ३० ते ४५ मिनिटं व्यायाम करणं, संतुलित आहार घेणं आणि शरीराचं वजन हळूहळू कमी करणं हा सर्वात प्रभावी उपाय मानला जातो. साखरयुक्त पेयं, प्रक्रिया केलेले अन्न, जास्त तेलकट पदार्थ आणि मद्यपान टाळल्यास लिव्हरवरील ताण कमी होतो.
फॅटी लिव्हरचं सर्वात सामान्य लक्षण म्हणजे सतत थकवा जाणवणं आणि शरीरात ऊर्जा कमी असल्यासारखं वाटणं. पुरेशी झोप घेतल्यानंतरही दिवसभर आळस आणि अशक्तपणा जाणवू शकतो. लिव्हरचं कार्य व्यवस्थित न झाल्यामुळे शरीरातील ऊर्जा निर्मितीवर परिणाम होतो.
लिव्हरच्या भागात म्हणजे पोटाच्या उजव्या वरच्या बाजूला हलका त्रास, दाब किंवा जडपणा जाणवू शकतो. काही लोकांना जेवणानंतर ही अस्वस्थता अधिक जाणवते. लिव्हरमध्ये चरबी वाढल्याने त्याचा आकार वाढू शकतो आणि त्यामुळे अशी लक्षणं दिसू शकतात.
फॅटी लिव्हर असलेल्या काही व्यक्तींना भूक कमी लागते किंवा अन्न खाल्ल्यानंतर मळमळ जाणवते. पचन व्यवस्थित होत नसल्यामुळे पोट फुगल्यासारखेही वाटू शकतं. ही लक्षणं दीर्घकाळ टिकत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.
फॅटी लिव्हरचा संबंध बहुतेक वेळा लठ्ठपणा आणि विशेषतः पोटाभोवती चरबी वाढण्याशी असतो. शरीराचं वजन झपाट्याने वाढणं हेही एक महत्त्वाचे संकेत असू शकतं. मधुमेह, उच्च कोलेस्टेरॉल आणि मेटाबॉलिक सिंड्रोम असलेल्या व्यक्तींमध्ये हा धोका अधिक असतो.