Bharat Jadhav
घर खरेदी करण्यासाठी पती आणि पत्नीने मिळून संयुक्त होम लोन घेतले आणि दुर्दैवाने दोघांपैकी एकाचा मृत्यू झाला, तर उर्वरित कर्जाची रक्कम कोण भरेल? बँक कर्ज माफ करते की दुसऱ्या पार्टनरलाच सर्व हप्ते भरावे लागतात? हे जाणून घेऊ.
पती आणि पत्नी जेव्हा एकत्र मिळून होम लोन घेतात, तेव्हा दोघांवरही कर्ज फेडण्याची समान जबाबदारी असते. पण दोघांपैकी कोणाचाही मृत्यू झाला, तर उर्वरित कर्जाची जबाबदारी संपत नसते. अशा परिस्थितीत हयात असलेल्या जोडीदारालाच बाकीचे सर्व EMI भरावे लागतात.
बँक कर्जाची हमी म्हणून घर गहाण ठेवलेले असते, त्यामुळे कर्ज न फेडल्यास बँक नियमानुसार मालमत्तेवरच दावा सांगून आपली थकबाकी वसूल करू शकते.
होम लोन घेताना 'होम लोन कव्हर/सुरक्षा विमा' घेतला होता की नाही, यावर बरेच काही अवलंबून असतात. जर समजा मृत व्यक्तीच्या हिशोबाच्या कर्जाचा विमा काढला असेल, तर विमा कंपनी उर्वरित रकमेचा तो हिस्सा भरते. यामुळे उर्वरित कुटुंबावर कर्जाचा ताण कमी होतो.
कर्जदाराच्या अकस्मात मृत्यूनंतर संपूर्ण कर्जाचा भार त्याच्या कुटुंबावर पडू नये, यासाठी होम लोन सुरक्षा विमा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
जर एका पार्टनरच्या मृत्यूनंतर उर्वरित हप्ते नियमितपणे भरले गेले नाहीत, तर बँक घर जप्त करू शकते. होम लोनच्या करारात घर हे बँकेकडे सुरक्षेचा भाग म्हणून गहाण असते. त्यामुळे हप्ते थकल्यास बँक कायदेशीर प्रक्रियेचा आणि कर्ज कराराचा अवलंब करून मालमत्ता लिलावात काढून शकते.