Surabhi Jayashree Jagdish
नोकरी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे EPFO चं अकाऊंट असणं गरजेचं असतं. अनेकदा यामध्ये बदल करण्याची आवश्यकता असते. आपले प्रोफाईल कसं अपडेट करावं, याविषयीची माहिती आज पाहूयात.
तुम्ही कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचे (EPFO) सदस्य असाल तर तुम्हाला तुमच्या खात्यात काही बदल करावे लागू शकतात. यामध्ये तुमचं नाव, जन्मतारीख (DOB), वैवाहिक माहिती किंवा आपल्या नागरिकत्वाशी संबंधित असू शकतात.
जर तुम्ही तुमचा UAN नंबर म्हणजेच युनिव्हर्सल अकाउंट नंबर १ ऑक्टोबर २०१७ पूर्वी एक्टिव्ह केला असेल तर आणि आधारद्वारे व्हेरिफाय केला गेला असेल तरच काही बदल डॉक्युमेंट्सशिवाय होऊ शकतात.
वरच् अटी पूर्ण झाल्यास तुम्ही तुमचं नाव, जन्मतारीख, नागरिकत्व, पालकांचं नाव, वैवाहिक माहिती, नोकरीत रुजू होण्याची तारीख आणि कोणतंही कागदपत्रं अपलोड न करता नोकरी सोडण्याची तारीख बदलू शकता.
EPFO च्या नवीन नियमांनुसार, नागरिकत्वामध्ये केवळ दोन प्रकरणांमध्ये बदल होणं शक्य आहे. पहिल्यांदा जेव्हा नागरिकत्वाचा कॉलम रिकामा असेल आणि दुसरं म्हणजे, जेव्हा तुम्हाला भारतीयातून आंतरराष्ट्रीय नागरिकत्वात बदल करायचा असेल.
जर तुमचा युएएन नंबर नसेल किंवा तो आधार कार्डशी लिंक नसेल तर संयुक्त घोषणापत्राचा फॉर्म भरून नियोक्त्याला द्यावा लागेल. नियोक्ता ते त्यांच्या EPFO खात्यातून अपलोड करेल आणि EPFO कडे पाठवेल. यानंतर कागदपत्रे EPFO कार्यालयात पोहोचतील.
अशा परिस्थितीत संयुक्त घोषणापत्रावर राजपत्रित अधिकारी, नोटरी पब्लिक, खासदार, पोस्ट मास्तर किंवा ग्रामपंचायत प्रमुख अशा अधिकृत व्यक्तींची स्वाक्षरी गरजेची असते. यासोबतच आवश्यक कागदपत्रे EPFO कार्यालयात सादर करावी लागतील.