Surabhi Jayashree Jagdish
अंघोळ करताना पाण्याचे थेंब आरशावर उडतात आणि त्यामुळे त्यावर डाग पडतात. पाणी सुकल्यानंतर त्यातील खनिजांचे छोटे कण आरशावर राहू शकतात. त्यामुळे आरशात चेहरा स्पष्ट दिसत नाही आणि त्याची चमक कमी झाल्यासारखी वाटते.
आरशावरील डाग साध्या कपड्याने पुसूनही अनेकदा निघत नाहीत. अशा वेळी योग्य पद्धतीने स्वच्छता केल्यास डाग कमी करण्यास मदत होते. यासाठी घरात सहज मिळणाऱ्या काही वस्तूंचा वापर करता येतो.
एका स्प्रे बाटलीत पांढरा व्हिनेगर आणि पाणी समान प्रमाणात मिसळा. हे मिश्रण आरशावरील डागांवर फवारा आणि पाच ते दहा मिनिटं तसंच ठेवा. त्यानंतर मऊ सुती किंवा मायक्रोफायबर कापडाने आरसा पुसून घ्या.
दोन ते तीन चमचे बेकिंग सोड्यात थोड पाणी घालून घट्ट पेस्ट तयार करा. ही पेस्ट डागांवर लावून मऊ स्पंजने हलक्या हाताने स्वच्छ करा. त्यानंतर स्वच्छ पाण्याने जागा पुसून कोरड्या कापडाने आरसा स्वच्छ करा.
लिंबाच्या रसात सायट्रिक ॲसिड असतं, जे पाण्यामुळे तयार झालेले काही खनिजांचे डाग कमी करण्यास मदत करू शकते. लिंबाचा रस मऊ कापडावर घेऊन डाग असलेल्या भागावर हलक्या हाताने लावा आणि काही मिनिटांनी ओल्या कापडाने पुसून घ्या. शेवटी कोरड्या कापडाने आरसा पुसा, म्हणजे त्यावर पाण्याचे नवीन डाग राहणार नाहीत.
आरशावरील काही डाग कमी करण्यासाठी साधी पांढरी टूथपेस्ट वापरता येते. थोडी टूथपेस्ट मऊ, ओलसर कापडावर घेऊन डाग असलेल्या भागावर हलक्या हाताने फिरवा. त्यानंतर स्वच्छ ओल्या कापडाने टूथपेस्ट पूर्ण पुसून टाका आणि आरसा कोरडा करा.
एका कप कोमट पाण्यात एक चमचा भांडी धुण्याचे लिक्विड आणि अर्धा कप व्हिनेगर मिसळा. हे मिश्रण स्पंजच्या मदतीने आरशावर लावून धूळ, तेलकटपणा आणि पाण्याचे डाग स्वच्छ करा. शेवटी स्वच्छ ओल्या कापडाने आरसा पुसून घ्या.