Sakshi Sunil Jadhav
हिवाळ्याच्या दिवसांत ओल्या हळदीचे लोणचे खाण्याची परंपरा भारतीय घराघरात पाहायला मिळते. हळदीचे औषधी गुण, आल्याची तिखट चव आणि लिंबाच्या आंबटपणाने तयार होणारे हे लोणचे केवळ चविष्टच नाही, तर आरोग्यासाठीही अतिशय लाभदायक आहे.
चला पाहूया याची सोप्या कृतीसह माहिती. हळदीचे लोणचे वरण-भात, आमटी, पिठलं-भाकरी, थालीपीठ किंवा पोळीसोबत अप्रतिम लागते. तिखट-आंबट-खमंग चव आरोग्य आणि चव दोन्ही देते.
पाव किलो ओली हळद, दोन इंच आलं, पाच हिरव्या मिरच्या, एक लिंबाचा रस, हळद आणि लाल मिरची पावडर, मीठ, मोहरीची डाळ, हिंग आणि तेल इ.
हळदीच्या गाठी पाण्यात एक तास ठेवल्याने त्यावरील माती निघून जाते. स्वच्छ धुतल्यानंतर साल काढून पातळ उभे काप करून घ्या.
आल्याचे साल काढून त्याचेही पातळ काप करा आणि हिरव्या मिरच्या उभ्या चिरून ठेवा. हेच लोणच्याला झणझणीतपणा देतात.
हळदीचे, आल्याचे आणि मिरच्यांचे काप एकत्र करून त्यात लिंबाचा रस, हळद पावडर, मीठ आणि लाल मिरची पावडर मिक्स करा.
हे मिश्रण किमान एक तास किंवा रात्रभर फ्रीजमध्ये ठेवल्यास मसाले नीट मुरतात आणि लोणच्याला अप्रतिम चव येते.
एका पॅनमध्ये तीन डाव तेल गरम करून त्यात हिंग, थोडी हळद आणि मोहरीची डाळ घालून फोडणी करा. ही फोडणी हळदीवर ओता आणि नीट मिक्स करा.
थंड झाल्यानंतर हे लोणचे तयार होते. याची सुगंध आणि रंग अगदी तोंडाला पाणी आणतो. लोणचे थंड झाल्यावर काचेच्या किंवा चिनी मातीच्या बरणीत भरून फ्रीजमध्ये ठेवा. हे लोणचे दोन महिने टिकते.