Surabhi Jayashree Jagdish
साऊथ इंडियन पद्धतीचा सांबार मसाला घरी बनवणं खूप सोपं आहे आणि यामुळे तुमच्या सांबाराला एकदम अस्सल, हॉटेलसारखी चव येते.
हा मसाला तुम्ही एकदा बनवून ठेवला की अनेक दिवस वापरू शकता.
४ मोठे चमचे सुखे धणे, २ मोठे चमचे चणा डाळ, १ मोठा चमचा उडीद डाळ, १ मोठा चमचा तांदूळ, १ मोठा चमचा जिरे, १ छोटा चमचा मेथी दाणे, १०-१२ सुख्या लाल मिरच्या, १/२ छोटा चमचा हिंग, १/२ छोटा चमचा मोहरी, १०-१५ कढीपत्त्याची पाने, १/२ छोटा चमचा हळद पावडर, १/२ छोटा चमचा काळी मिरी, १/२ छोटा चमचा तेल
एका कढईत मध्यम आचेवर गरम करा. त्यात थोडे तेल घाला. आता त्यात चणा डाळ, उडीद डाळ, तांदूळ, मेथी दाणे आणि काळी मिरी घालून हलके सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. भाजलेले मसाले एका प्लेटमध्ये काढून ठेवा.
त्याच पॅनमध्ये धने, जिरे आणि मोहरी घालून एक मिनिटभर भाजून घ्या. त्यांचा सुगंध आल्यावर तेही प्लेटमध्ये काढून ठेवा. आता कढीपत्त्याची पाने घालून कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या.
शेवटी, सुक्या लाल मिरच्या घालून त्यांचा रंग किंचित गडद होईपर्यंत आणि त्या कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या. हे सर्व मसाले पूर्णपणे थंड होऊ द्या.
सर्व भाजलेले आणि थंड झालेले मसाले मिक्सरच्या भांड्यात घ्या. त्यात हळद पावडर आणि हिंग घालून बारीक पावडर करून घ्या. मसाला एकदम बारीक असावा. मिक्सर जास्त गरम होऊ नये म्हणून थोड्या वेळाने थांबून पुन्हा वाटा.
हा मसाला बनवताना मसाले करपणार नाहीत याची काळजी घ्या, कारण करपल्यास सांबाराची चव कडवट होऊ शकते.