Surabhi Jayashree Jagdish
मुरादाबादी बिरयानी बनवण्यासाठी 1 किलो बासमती किंवा सेला तांदूळ स्वच्छ धुवून घ्या. हे तांदूळ किमान 1 तास पाण्यात भिजत ठेवावेत, त्यामुळे बिरयानीचा भात मोकळा होतो.
चिकनमध्ये आलं-लसूण पेस्ट, हिरवी मिरची पेस्ट, दही, बडीशेप-धणे पावडर, मीठ आणि लिंबाचा रस घालून मिक्स करा. हे मिश्रण किमान 30 मिनिटं मॅरिनेट करून ठेवल्याने चिकन अधिक चवदार आणि रसाळ होतं.
एका कढईत तेल गरम करून बारीक चिरलेला कांदा छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्या. हा तळलेला कांदा बिरयानीवर टाकल्याने तिची चव आणि सुगंध आणखी वाढतो.
गरम तेल किंवा तुपामध्ये तमालपत्र, काळी वेलची, दालचिनी यांसारखे खडे मसाले घाला. यानंतर मॅरिनेट केलेलं चिकन टाकून ते मसाल्यांसोबत व्यवस्थित परतून शिजवून घ्या.
चिकन शिजल्यानंतर तांदळाच्या प्रमाणानुसार पाणी घाला. साधारणपणे तांदळाच्या दुप्पट पाणी वापरलं जातं. या बिर्यानीची खासियत म्हणजे लाल तिखटाऐवजी हिरव्या मिरचीचा जास्त वापर केला जातो.
पाणी उकळल्यानंतर भिजवलेले तांदूळ त्यात टाका आणि शिजू द्या. पाणी आटल्यावर भांड्याचं झाकण बंद करून बिरयानीला मंद आचेवर 15 ते 20 मिनिटं दम द्या.
बिरयानी तयार झाल्यानंतर वरून केवडा वॉटर आणि फूड कलर घाला. गरमागरम मुरादाबादी बिरयानी हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.