Sakshi Sunil Jadhav
पावसाळ्यात फॅमिलीसोबत मस्तपैकी टिव्ही पाहत काहीतरी चटपटीत खावसं वाटत असेल तर ही चणा कोळीवाडा ही रेसिपी बेस्ट आहे.
२ कप उकडलेले काबुली चणे, २ चमचा बेसन, २ चमचा तांदळाचे पीठ, १ चमचा आले-लसूण पेस्ट, १ चमचा लाल तिखट, अर्धा टीस्पून हळद, १ चमचा धणे-जिरे पूड, अर्धा चमचा गरम मसाला, चिमूटभर हिंग, चवीनुसार मीठ, १ चमचा लिंबाचा रस, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि तळण्यासाठी तेल.
सर्वप्रथम उकडलेल्या काबुली चण्यांमधले जास्तीचे पाणी पूर्णपणे काढून चणे कोरडे करून घ्या.
एका मोठ्या भांड्यात बेसन, तांदळाचे पीठ, लाल तिखट, हळद, धणे-जिरे पूड, गरम मसाला, हिंग आणि मीठ एकत्र करून चांगले मिक्स करून घ्या.
आता त्यामध्ये आले-लसूण पेस्ट आणि लिंबाचा रस घालून मसाला मिक्स करा. तयार मसाल्यात उकडलेले चणे घालून प्रत्येक चण्याला मसाल्याचा समान थर लागेल अशा पद्धतीने हलक्या हाताने मिक्स करा.
मिश्रणात बारीक चिरलेली कोथिंबीर घालून ते १० ते १५ मिनिटे मुरण्यासाठी बाजूला ठेवा.
कढईत पुरेसे तेल गरम करा. तेल मध्यम आचेवर चांगले तापले आहे याची खात्री करा.
मुरवलेले चणे थोड्या-थोड्या प्रमाणात गरम तेलात सोडा आणि सोनेरी रंग येईपर्यंत कुरकुरीत तळा. तळलेले चणे टिश्यू पेपरवर काढून घ्या, त्यामुळे जास्तीचं तेल शोषले जाईल आणि चणा कोळीवाडा जास्त कुरकुरीत राहतील.
गरमागरम चणा कोळीवाडा हिरवी चटणी, टोमॅटो सॉस किंवा कांदा-लिंबासोबत सर्व्ह करा आणि त्याच्या झणझणीत चवीचा आस्वाद घ्या.