Surabhi Jayashree Jagdish
झालमुडी ही पश्चिम बंगालमधील एक अतिशय लोकप्रिय आणि चटपटीत स्ट्रीट फूड डिश आहे. जी हलकी असूनही तुमचं पोट भरते. नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रॅलीदरम्यान रस्त्याच्या कडेला थांबून ही भेळ चाखली आणि पुन्हा एकदा ती चर्चेत आली.
कोलकात्याच्या गल्ल्यांमध्ये मिळणारी ही डिश मसाले, भाज्या आणि मुरमुरे यांच्या अनोख्या मिश्रणामुळे खास ओळखली जाते. घरच्या घरीही ही भेळ अगदी सहज आणि पटकन तयार करता येते.कोलकात्याची प्रसिद्ध डीश
झालमुडी बनवण्यासाठी मुरमुरे, बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो हे साहित्य लागेल. यासोबत उकडलेला बटाटा, काकडी आणि हिरवी मिरची, शेंगदाणे, चाट मसाला, लाल तिखट, मीठ, मोहरीचं तेल, लिंबाचा रस, शेव आणि कोथिंबीर यामुळे या भेळीला पूर्ण स्वाद मिळतो.
एका मोठ्या भांड्यात मुरमुरे घालून घ्यावेत. त्यात चिरलेला कांदा, टोमॅटो, काकडी आणि उकडलेला बटाटा टाकून चांगलं एकत्रित करावं. यानंतर हिरवी मिरची घालून भेळेला थोडी तिखट चव द्यावी.
या मिश्रणात शेंगदाणे घातल्याने भेळीत कुरकुरीतपणा येतो. त्यामुळे झालमुडी अधिक चवदार आणि खाण्यात मजेदार बनते.
यानंतर मिश्रणात मीठ, लाल तिखट आणि चाट मसाला घालावा. या मसाल्यांमुळे झालमुडीला तिखट आणि चटपटीत चव मिळते. मसाले नीट मिसळल्याने प्रत्येक घासात सारखा स्वाद जाणवतो.
शेवटी मोहरीचं तेल आणि लिंबाचा रस घालून मिश्रण व्यवस्थित हलवा. यानंतर वरून शेव आणि कोथिंबीर टाकल्याने भेळ अधिक आकर्षक दिसते. तयार झालेली झालमुडी लगेच सर्व्ह करावी. मुरमुरे कुरकुरीत राहतात.
झालमुडीची सर्वात मोठी खासियत म्हणजे तिचा तिखट, आंबट आणि चटपटीत स्वाद आहे. हलकी असूनही ही भेळ तुमचं पोट भरते. त्यामुळे ती स्नॅक म्हणून उत्तम पर्याय ठरते.