Surabhi Jayashree Jagdish
थंडी असो वा उन्हाळा, कोणत्याही ऋतूमध्ये जेवणासोबत लोणचं प्रत्येकाचं आवडतं असतं. लोणचं जेवणाला चवदार बनवतं आणि खाण्याची मजा वाढवतो. त्यामुळे लोणचं नेहमीच जेवणात खास असतं.
पंचरत्न लोणचं बाजारात सहज मिळतं, पण ते घरच्या घरी बनवणं अधिक चविष्ट ठरतं. घरगुती लोणचं बनवलं की, त्यात शुद्धता आणि ताजेपणा असतो. चला तर मग जाणून घेऊया हे लोणचं घरात कसं तयार करतात.
पंचरत्न लोणचं फक्त पाच भाज्यांपासून बनतं. यात गाजर, आवळा, आलं, लसूण आणि हिरवी मिरची यांचा समावेश असतो. या पाच घटकांमुळे लोणच्याला खास चव मिळते.
दोन गाजर, सात-आठ आवळे, पंचवीस-तीस ग्रॅम आलं, शंभर ग्रॅम लसूण आणि शंभर ग्रॅम हिरव्या मिरच्या घ्याव्यात. या सर्वांचे छोटे-छोटे तुकडे करून ठेवा. भाज्या नीट चिरल्यामुळे लोणचं व्यवस्थित मुरतं.
तीन चमचे जिरे, तीन चमचे बडीशेप, तीन चमचे मेथी, दोन ते चार लवंगा आणि एक चमचा काळी मिरी लागते. हे सर्व मसाले हलकेसे भाजून घ्यावेत. भाजून झाल्यावर थंड करून मिक्सरमध्ये वाटून घ्यावेत.
कढईत थोडं मोहरीचं तेल घ्यावं आणि ते पूर्णपणे गरम करावं. त्यात वाटलेला मसाला टाकावा आणि नंतर चिरलेल्या भाज्या घालाव्यात. भाज्या मसाल्यात नीट मिसळल्या पाहिजेत. त्यानंतर दोन चमचे लाल तिखट आणि दोन चमचे मीठ घालावं.
पूर्णपणे थंड होण्याची वाट पाहावी. त्यानंतर त्यात व्हिनेगर घालावा, ज्यामुळे लोणच्याला आंबटसर चव मिळते आणि टिकण्याचा कालावधी वाढतो. शेवटी हे लोणचं काचेच्या बरणीत भरून ठेवावं.