Surabhi Jayashree Jagdish
० ते ३ महिन्यांच्या बाळांना साधारणपणे २४ तासांच्या कालावधीत १४ ते १७ तास झोप आवश्यक असते. या वयात बाळाची झोप सलग नसते आणि ती दिवसभरातील अनेक छोट्या टप्प्यांमध्ये विभागलेली असू शकते.
४ ते १२ महिन्यांच्या बाळांना साधारण १२ ते १६ तास, तर १ ते २ वर्षांच्या मुलांना ११ ते १४ तास झोपेची शिफारस केली जाते. ३ ते ५ वर्षांच्या मुलांना साधारण १० ते १३ तास झोप आवश्यक असते आणि यात दिवसाची झोपही समाविष्ट असू शकते.
६ ते १२ वर्षांच्या मुलांसाठी दररोज ९ ते १२ तास झोप घेण्याची शिफारस केलीये. या वयात शाळा, अभ्यास आणि खेळ यामुळे मुलांची शारीरिक व मानसिक ऊर्जा मोठ्या प्रमाणात खर्च होते. त्यामुळे नियमित आणि पुरेशी झोप घेणं महत्त्वाचं आहे.
१३ ते १८ वर्षांच्या किशोरवयीन मुलांसाठी दररोज ८ ते १० तास झोप योग्य मानली जाते. या वयात शरीरातील हार्मोन्स आणि जैविक घड्याळात बदल होत असल्यामुळे अनेक मुलांना रात्री उशिरा झोपण्याची सवय लागते.
बहुतेक निरोगी प्रौढ व्यक्तींना दररोज ७ ते ९ तास झोप घेण्याची गरज असते. कामाचा ताणतणाव, स्क्रीनचा वाढलेला वापर किंवा अनियमित लाईफस्टाईलमुळे अनेक प्रौढांची झोप यापेक्षा कमी होते. सातत्याने अपुरी झोप घेतल्यास आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात.
६५ वर्षांवरील व्यक्तींनाही साधारण ७ ते ९ तास झोपेची गरज असते. मात्र वय वाढल्यानंतर रात्री वारंवार जाग येणं किंवा झोप लागण्यासाठी जास्त वेळ लागणं यांसारखे बदल दिसू शकतात.
दररोज ठराविक तास झोपूनही वारंवार जाग येत असेल किंवा सकाळी उठल्यानंतर थकवा जाणवत असेल तर झोपेची गुणवत्ता चांगली नसते. झोपेच्या कमतरतेची भरपाई करण्यासाठी अधूनमधून जास्त झोप घेणं उपयोगी वाटू शकतं.
ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.