Surabhi Jayashree Jagdish
भारतात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या वाहनांमध्ये बाइकचा समावेश होतो. अनेक लोक रोज ऑफिसला जाण्यासाठी किंवा इतर कामांसाठी बाइकचा वापर करतात. त्यामुळे बाइकची योग्य देखभाल करणं गरजेचं आहे.
बाइकचा प्रवास सुरक्षित आणि आरामदायी होण्यासाठी टायरमध्ये योग्य प्रमाणात हवा असणं महत्त्वाचं आहे. टायरमध्ये हवा कमी किंवा जास्त असल्यास बाइक चालवताना अडचणी येऊ शकतात. त्यामुळे प्रवासाला निघण्यापूर्वी टायरमधील हवेच्या प्रमाणाकडे लक्ष द्यावं.
बाइकच्या टायरमधील हवेचा दाब PSI या मापात मोजला जातो. PSI म्हणजे पाउंड्स पर स्क्वेअर इंच असं आहे. टायरमध्ये किती हवा भरली आहे हे तपासण्यासाठी एअर प्रेशर गेजचा वापर केला जातो.
साधारणपणे बाइकच्या मागच्या टायरमध्ये ३० ते ४० PSI हवा ठेवली जाते. पण प्रत्येक बाइकसाठी हवेचं प्रमाण सारखं नसतं. तुमच्या बाइकच्या कंपनीने दिलेल्या सूचनेनुसारच टायरमध्ये हवा भरावी.
बाइकचं मॉडेल, प्रकार आणि त्यावर असलेलं वजन यानुसार टायरमधील हवेचा दाब ठरतो. प्रत्येक बाइकची रचना आणि टायरचा आकार वेगळा असल्याने हवेचं प्रमाणही बदलू शकतं. त्यामुळे बाइकच्या मॅन्युअलमध्ये दिलेल्या हवेच्या दाबाची माहिती तपासावी.
बाइकवर फक्त एक व्यक्ती बसली असेल तर मागच्या टायरमध्ये साधारण ३० ते ३२ PSI हवा ठेवली जाते. पण दोन व्यक्ती बसणार असतील, तर मागच्या टायरमध्ये साधारण ३४ ते ३७ PSI हवा लागू शकते. हे प्रमाण बाइकच्या कंपनीने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार तपासणं आवश्यक आहे.
टायरमध्ये योग्य प्रमाणात हवा असल्यास रस्त्यावर टायरची पकड चांगली राहण्यास मदत होते. हवा कमी किंवा जास्त असल्यास टायर लवकर झिजण्याची शक्यता असते. त्यामुळे बाइकच्या टायरमधील हवा वेळोवेळी तपासावी.