Surabhi Jayashree Jagdish
आजकाल बदललेली जीवनशैली, ताणतणाव आणि चुकीच्या आहारामुळे अनेकांना सतत ब्लड प्रेशर वाढण्याची समस्या जाणवते. उच्च रक्तदाब सुरुवातीला साधा वाटला तरी तो हृदय, मेंदू आणि किडनीसाठी धोकादायक ठरू शकतो.
नियमित चालण्यासारखा साधा व्यायामही ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यात मोठी मदत करतो. योग्य वेळ, संतुलित आहार आणि नियमित सवयी पाळल्यास रक्तदाब नैसर्गिकरीत्या कमी करण्यास मदत मिळू शकते.
जास्त मीठ खाणं, तेलकट पदार्थांचं सेवन आणि व्यायामाचा अभाव ही उच्च रक्तदाबाची प्रमुख कारणं मानली जातात. सततचा मानसिक ताण, कमी झोप आणि धूम्रपान-दारूचे सेवन यामुळेही रक्तदाब वाढतो.
नियमित चालल्याने शरीरातील रक्ताभिसरण सुधारतं आणि हृदयावरचा ताण कमी होतो. चालण्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते, त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो.
तज्ज्ञांच्या मते, ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी दिवसातून किमान ३० ते ४५ मिनिटं वेगाने चालणं फायदेशीर ठरतं. आठवड्यातून किमान पाच दिवस नियमित चालल्यास रक्तदाबात सकारात्मक बदल दिसू शकतो.
चालताना खूप वेगाने सुरुवात करू नये, शरीराला सवय होण्यासाठी मध्यम गती ठेवावी. सकाळी किंवा संध्याकाळी थंड वातावरणात चालल्यास शरीराला अधिक आराम मिळतो. चालण्याआधी आणि नंतर पुरेसं पाणी पिणंही अत्यंत गरजेचं असतं.
फळं, हिरव्या भाज्या, ओट्स आणि कमी मीठ असलेला आहार रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो. पॅकेज्ड फूड, जास्त साखर आणि फास्टफूडचं सेवन कमी करणं आवश्यक असतं.