Surabhi Jayashree Jagdish
पोळीमध्ये कर्बोदके असतात. कर्बोदकांमुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. पण आपण गरजेपेक्षा जास्त पोळ्या खाल्ल्या, तर शरीराला जास्त ऊर्जा मिळते. ही जास्त ऊर्जा शरीरात चरबीच्या रूपात साठू शकते. त्यामुळे हळूहळू वजन वाढू शकते.
पोळी खाल्ल्यानंतर त्यातील कर्बोदके शरीरात ग्लुकोजमध्ये बदलतात. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. एकाच वेळी खूप पोळ्या खाल्ल्या तर शरीरात जास्त कर्बोदके जातात आणि रक्तातील साखरेवर त्याचा परिणाम होऊ शकतो.
गव्हाच्या पोळीमध्ये फायबर असते. फायबर शरीरासाठी चांगलं असले तरी एकाच वेळी खूप पोळ्या खाल्ल्या तर काही लोकांना गॅस होऊ शकतो. पोट फुगल्यासारखं वाटू शकतं किंवा पोट जड होऊ शकतं.
फक्त पोळ्याच जास्त खाऊन भाज्या, फळं आणि कडधान्यं कमी खाल्ली तर आहार योग्य राहणार नाही. तसंच दिवसभर पुरेसं पाणी प्यायलं नाही तर शौचाला त्रास होऊ शकतो. त्यामुळे पोळीसोबत भरपूर भाज्या, फळे आणि कडधान्यं खाणं आणि पुरेसं पाणी पिणं गरजेचं आहे.
सगळ्यांनी सारख्याच पोळ्या खाव्यात असं नाही. एखाद्या व्यक्तीचं वय, वजन, काम आणि व्यायाम यावर तिच्या शरीराला किती ऊर्जा हवी हे ठरते. जास्त शारीरिक मेहनत करणाऱ्या व्यक्तीला थोड्या जास्त पोळ्या लागतील.
पोळी छोटी आहे की मोठी, पातळ आहे की जाड, यावरही तिच्यातील कर्बोदके आणि कॅलरीचं प्रमाण बदलतं. मोठी किंवा जाड पोळी खाल्ल्यास शरीरात तुलनेने जास्त कर्बोदके आणि कॅलरी जातात.
साधारणपणे एका जेवणात २ ते ३ मध्यम आकाराच्या पोळ्या अनेक प्रौढ व्यक्तींसाठी योग्य प्रमाण असू शकते. पण हे प्रत्येकासाठी सारखं नसतं. पोळीसोबत भाजी, डाळ किंवा कडधान्यं आणि प्रोटीन असलेले पदार्थ खाणं फायदेशीर आहे.