Surabhi Jayashree Jagdish
१५ ऑगस्टला झेंडावंदनासाठी जात असाल, तर राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. ध्वज उतरवल्यानंतर तो निष्काळजीपणे हाताळू नये किंवा जमिनीवर पडू देऊ नये. ध्वजाची घडी करताना स्वच्छता, काळजी आणि योग्य पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक आहे.
ध्वज आडवा पसरून ठेवा. घडी करण्यापूर्वी ध्वज नीट सरळ आणि व्यवस्थित पसरलेला आहे, याची खात्री करा. घडी करताना ध्वज जमिनीला लागणार नाही, याचीही काळजी घ्या.
केशरी व हिरवा पट्टा मध्यभागी पांढऱ्या पट्ट्याखाली येईल अशा पद्धतीने घडी घाला. घडी घालताना पट्टे व्यवस्थित जुळलेले राहतील याची काळजी घ्या. राष्ट्रध्वजाची घडी घाईघाईने न करता काळजीपूर्वक करणं महत्त्वाचं आहे.
पांढऱ्या पट्ट्याची घडी अशा प्रकारे करा की अशोकचक्र स्पष्टपणे दिसेल आणि केशरी व हिरव्या पट्ट्यांचा काही भाग दिसेल. घडी केल्यानंतर अशोकचक्र झाकलं जाणार नाही, याची खात्री करा. राष्ट्रध्वजाची ओळख आणि सन्मान कायम राहील अशा पद्धतीने ही घडी पूर्ण करावी.
घडी केलेला राष्ट्रध्वज तळहातावर किंवा हातावर घेऊन योग्य ठिकाणी ठेवा. घडी केलेला ध्वज सुरक्षित, स्वच्छ आणि सन्मानपूर्वक ठेवला पाहिजे. राष्ट्रध्वजाचा कोणत्याही प्रकारे अनादर होणार नाही, याची प्रत्येकाने काळजी घ्यावी.
भारतीय राष्ट्रध्वजामध्ये वर केशरी, मध्यभागी पांढरा आणि खाली हिरवा असे तीन आडवे पट्टे असतात. पांढऱ्या पट्ट्याच्या मध्यभागी नेव्ही ब्ल्यू रंगाचे २४ आरे असलेले अशोकचक्र असते. राष्ट्रध्वजाची लांबी आणि रुंदी यांचं प्रमाण ३:२ असतं.
भारतीय राष्ट्रध्वजाचा वापर आणि प्रदर्शन Flag Code of India, 2002 तसंच संबंधित कायदेशीर तरतुदींनुसार केलं जातं. फाटलेला किंवा विस्कटलेला राष्ट्रध्वज प्रदर्शित करू नये आणि ध्वजाला नेहमी सन्मानाचं स्थान द्यावं.