Surabhi Jayashree Jagdish
बाईकच्या इंजिनमधील ऑईल इंजिनचे भाग सुरळीत चालण्यास मदत करतं. त्यामुळे वेळोवेळी ऑईलची पातळी तपासा आणि कमी असल्यास बाईकच्या कंपनीने सांगितलेल्या प्रकारचं ऑईल वापरा.
तुमच्या बाईकमध्ये कूलंट सिस्टीम असेल, तर कूलंटची पातळी नियमित तपासणं गरजेचं आहे. कूलंटमुळे इंजिनमधील उष्णता कमी होण्यास मदत होते. कूलंट कमी असल्यास बाईकच्या मॅन्युअलनुसार ते भरा आणि गळती दिसल्यास मेकॅनिककडून तपासून घ्या.
लांबचा प्रवास करताना बाईक सतत अनेक तास चालवण्याऐवजी गरजेनुसार मध्ये थोडा ब्रेक घ्या. यामुळे तुम्हालाही आराम मिळतो आणि इंजिनचं तापमान वाढत असल्यास ते लक्षात येऊ शकतं.
मोठ्या ट्रॅफिकमध्ये बाईक बराच वेळ एकाच जागी उभी असेल, तर विनाकारण इंजिन सुरू ठेवणं टाळा. एअर-कूल्ड इंजिन असलेल्या बाईकमध्ये कमी वेगात किंवा जागेवर उभं असताना थंड होण्यासाठी हवेचा प्रवाह कमी मिळतो. त्यामुळे बराच वेळ थांबावं लागणार असेल, तर सुरक्षित परिस्थितीत इंजिन बंद करा.
बाईकची नियमित सर्व्हिसिंग केल्यामुळे इंजिनमधील संभाव्य समस्या वेळेवर लक्षात येतात. सर्व्हिसिंग करताना इंजिन ऑईल, एअर फिल्टर आणि कूलिंग सिस्टीमची तपासणी करून घ्या.
बाईकवर क्षमतेपेक्षा जास्त वजन ठेवल्यास इंजिनवर अधिक ताण येऊ शकतो. त्यामुळे बाईकची वजन वाहून नेण्याची मर्यादा लक्षात घेऊनच सामान किंवा प्रवासी घेऊन जा.
बाईकमधून जळल्यासारखा वास येत असेल किंवा इंजिन नेहमीपेक्षा खूप गरम झाल्याचं जाणवत असेल, तर हे दुर्लक्ष करण्यासारखं नाही. अशा वेळी बाईक सुरक्षित ठिकाणी थांबवून इंजिन बंद करा आणि ते थंड होऊ द्या.