ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
भारतात लग्न म्हणजे केवळ दोन व्यक्तींचे मिलन नाही तर दोन कुटुंबे आणि संस्कृतींचे मिलन देखील आहे.
अनेकदा असा प्रश्न उद्भवतो की, लग्न दिवसा करावे की रात्री? काय सांगतं ज्योतिषशास्त्र, जाणून घ्या.
वाल्मिकी रामायणानुसार, भगवान राम आणि माता सीतेचा विवाह दुपारी झाला होता. त्याचप्रमाणे शिवपुराणातही भगवान शिव आणि देवी पार्वती यांच्या लग्नाचा उल्लेख दिवसा होता.
पूर्वीच्या काळात, यज्ञ आणि धार्मिक विधी बहुतेकदा दिवसा केले जात असत. या विधींमध्ये सूर्य आणि अग्नीची उपस्थिती अत्यंत शुभ मानली जात असे म्हणून दिवसा लग्न केले जायचे.
दिवसाचा प्रकाश हा सकारात्मकतेचा प्रतीक मानला जातो. मान्यतेनुसार, सूर्यप्रकाशात लग्न केल्याने नवविवाहित जोडप्याचे जीवन देखील उज्ज्वल आणि शुद्ध होते. म्हणून दिवसा लग्न करण्याला प्राधान्य दिले जायचे.
ज्योतिषशास्त्रात, चंद्र हा विवाहासाठी जबाबदार ग्रह तर शुक्र वैवाहिक आनंदाचा ग्रह मानला जातो. रात्री चंद्राचा प्रभाव सर्वाधिक असतो, ज्यामुळे वैवाहिक जीवनात शांती आणि आनंद येतो.
दिवसा राहुकाल, यमगंडा आणि गुलिकाल सारखे अशुभ काळ असतात जे टाळणे कठीण असते. रात्रीच्या वेळी या दोषांचा प्रभाव कमी असतो. याच कारणामुळे पंडित आणि ज्योतिषी अनेकदा रात्रीच्या लग्नाचा सल्ला देतात.
आश्वलायन गृह्यसूत्रानुसार, ग्रह आणि नक्षत्रांच्या अनुकूलतेच्या आधारावर दिवसा किंवा रात्री कधीही विवाह करता येतो. तर,मनुस्मृतीनुसार, लग्न फक्त शुभ मुहूर्तावर आणि चंद्राच्या शुभ स्थितीतच करावे, वेळेचे कोणतेही बंधन नाही. नारद पुराणात म्हटले आहे की जर लग्न शुभ तिथीला रात्री झाले तर त्या जोडप्याला आनंद आणि दीर्घायुष्य मिळते.