ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सनातन धर्मात श्री कृष्ण जन्माष्टमीच्या पवित्र दिवसाला मोठे महत्त्व आहे. या दिवशी कृष्ण कन्हैयाची आराधना केली जाते.
यावेळी कृष्णाला ५६ भोग म्हणजेच ५६ प्रकारच्या सात्विक खाद्यपदार्थांचा नैवेद्य अर्पण केला जातो.
पण हा नैवेद्य केवळ ५६ पादार्थांचाच का असतो? असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का, चला तर मग जाणून घेऊया.
लहानपणी कान्हा रोज २४ तासांत ८ वेळा अन्न ग्रहण करत असे. म्हणून यशोदा माताने नित्य नियमाने कान्हासाठी रोज ८ वेळा जेवण वाढून ठेवण्याचा संकल्प केला होता.
आख्यायिकेनुसार कृष्णाचे ऐकून गावकऱ्यांनी इंद्रयज्ञ सोडून गोवर्धन पर्वताची पुजा केली. याच क्रोधात इंद्रदेवाने गोकुळात सलग ७ दिवस मुसळधार पावसाचा वर्षाव केला.
म्हणून गोकुळवासियांच्या रक्षणासाठी श्री कृष्णाने संपूर्ण ७ दिवस, गोवर्धन पर्वत एका करंगळीवर उचलून धरला होता.
यादिवसांत कृष्णाने काहीही खाल्ले नव्हते. यामुळे याशोदा मातेला लाडक्या कान्हाला रोज ८ वेळा जेवण वाढण्याचा संकल्प पूर्ण करता आला नाही.
याची भरपाई म्हणून तिने ७ दिवसातील प्रत्येक दिवसाचे ८ वेळेचे जेवण याप्रमाणे ५६ प्रकारचे पदार्थ कान्हाला खाऊ घातले.
तेव्हापासून श्री कृष्णाला ५६ भोग अर्पण करण्याची परंपरा सुरू झाली. यामध्ये लोणी, मिठाई, फळे आणि इतर सात्विक पदार्थांचा समावेश असतो.