Surabhi Jayashree Jagdish
नेरळ आणि माथेरान परिसरातील धबधब्यांना पावसाळ्यात खास आकर्षण असतं. निसर्गाचं अप्रतिम रूप, धबधब्याचा गडगडाट, हिरवाई आणि थोडं साहस अनुभवायचं असेल तर आम्ही आज सांगणारी ठिकाणं एकदम योग्य आहेत.
धोदणी धबधबा आणि आनंदवाडी धबधबा हे दोन सर्वाधिक प्रसिद्ध पर्याय असले तरी, या भागात अजून काही लपलेली रत्नं आहेत जी एकदातरी नक्कीच अनुभवायला हवीत.
चला जाणून घेऊया नेरळ आणि माथेरानजवळील अशाच काही सुंदर धबधब्यांबद्दल, जे पावसाळ्यात एक दिवसाच्या सहलीसाठी परफेक्ट आहेत.
माथेरानच्या टेकड्यांमध्ये वसलेला धोदणी धबधबा हा केवळ सौंदर्यासाठीच नाही तर वॉटरफॉल रॅपलिंगसाठीही प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात धबधब्याचा वेग वाढलेला असतो, आणि धबधब्याच्या खाली उभं राहून त्याचा थरार अनुभवणं ही एक वेगळीच मजा असते.
नेरळपासून फारसं लांब नसलेला आनंदवाडी धबधबा हा माथेरानच्या डोंगररांगेत वसलेला आहे. हिरव्यागार झाडीने वेढलेलं हे ठिकाण एकदिवसीय सहलीसाठी योग्य आहे.
नेरळजवळच असलेला भिवपुरी धबधबा हा तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. विशेषतः रविवारच्या दिवशी इथं मित्रपरिवार सहलीसाठी येतो. हा धबधबा फार उंच नसला तरी त्याचं सौंदर्य आणि शांती मनाला प्रसन्न करतं.
नेरळजवळ असलेल्या छोट्याशा गावात वसलेला टपालवाडी धबधबा हा अजूनही अनेकांना फारसा माहिती नाही. इथं गर्दी कमी असते, त्यामुळे तुम्हाला खरंखुरं निसर्गरम्य वातावरण अनुभवायला मिळतं.
माथेरानच्या छोट्या रस्त्यांवरून चालत चालत गेलं की तुम्हाला इथला माथेरान धबधबा दिसतो. धुक्याने भरलेली हवा, पक्ष्यांची किलबिल, आणि खालून वर पडणाऱ्या पाण्याचा आवाज हे सगळं मिळून तुमचा मूडच फ्रेश करून टाकतं.