Surabhi Jayashree Jagdish
उन्हाळ्याच्या तीव्र झळांमुळे शरीरावर अनेकदा गंभीर परिणाम होतात. काही वेळा हे परिणाम इतके धोकादायक ठरतात की तात्काळ उपचार न मिळाल्यास जीवावरही बेतू शकतं. अशाच दोन गंभीर वैद्यकीय आपत्कालीन स्थितींमध्ये ‘हीट स्ट्रोक’ आणि ‘हार्ट अटॅक’ यांचा समावेश होतो.
अनेकदा यांची लक्षणं एकसारखी वाटतात, त्यामुळे गोंधळ होण्याची शक्यता जास्त असते. या दोन्ही स्थितींमधील फरक समजून घेणं अत्यंत गरजेचं असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. हीट स्ट्रोक आणि हार्ट अटॅक दोन्हीही मेडिकल इमर्जन्सी आहेत, पण त्यांची कारणं आणि शरीरावर होणारे परिणाम पूर्णपणे वेगळे असतात.
हीट स्ट्रोक तेव्हा होतो ज्यावेळी शरीरात उष्णतेचं प्रमाण धोकादायक पातळीपर्यंत वाढतं आणि शरीर ती उष्णता बाहेर टाकू शकत नाही. जास्त वेळ उन्हात राहणं, तीव्र उष्ण वातावरणात काम करणं किंवा शरीरात पाण्याची कमतरता होणं ही त्याची प्रमुख कारणं असतात.
मात्र हार्ट अटॅक हा वेगळ्याच कारणामुळे होतो. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्यास हृदयाच्या स्नायूंना ऑक्सिजन मिळणं कमी होतं आणि त्यामुळे हार्ट अटॅक येतो.
हीट स्ट्रोकमध्ये शरीराचं तापमान 40°C (104°F) पेक्षा जास्त वाढलेलं दिसतं. अशावेळी त्वचा गरम आणि कोरडी वाटणं किंवा प्रचंड घाम येणं, चक्कर येणं, गोंधळ होणं, डोकेदुखी, मळमळ, अशक्तपणा, हृदयाचे ठोके वेगाने वाढणं आणि काही वेळा बेशुद्ध पडणं अशी लक्षणं दिसू शकतात.
छातीत तीव्र वेदना किंवा दडपण जाणवणं, छातीमध्ये जडपणा, वेदना हात, मान, जबडा, पाठ किंवा खांद्यापर्यंत पसरत जाणं, श्वास घेण्यास त्रास होणं, घाम येणं, मळमळ आणि अचानक अशक्तपणा जाणवणं ही सामान्य लक्षणं आहेत.
एखाद्या व्यक्तीला हीट स्ट्रोकची लक्षणं दिसत असतील तर त्याला लगेच थंड ठिकाणी हलवून शरीर थंड करण्याचा प्रयत्न करावा आणि तात्काळ वैद्यकीय मदत घ्यावी. त्याचप्रमाणे हार्ट अटॅकचा संशय आला तरीही विलंब न करता तातडीने उपचार सुरू करणं गरजेचं आहे.