Bharat Jadhav
रवा, पोहे, तांदळापासून तयार केलेले अप्पे तुम्ही खाल्ले असतील. पण अनेकदा हे अप्पे चिकटतात, लगदा होतो, व्यवस्थित फुगत नाहीत. पण काही सोप्या ट्रिक्स लक्षात ठेवल्या तर अप्पे पौष्टिकही होतील.
मुलांची हाडे बळकट करण्यासाठी हिरवे मूग फायदेशीर असतात. हिरव्या मुगात फायबर, आयर्न, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी मुबलक प्रमाणात असते.
यामुळे रवा किंवा तांदळापासून अप्पे बनवण्याऐवजी आपण हिरव्या मूगपासून अप्पे बनवू.
भिजवलेले हिरवे मूग - १ वाटी,लसूण पाकळ्या - ५ ते ६, हिरव्या मिरच्या - २ ते ३, कढीपत्ता - ४ ते ५ पाने, कोथिंबीर - आवश्यकतेनुसार रवा - १ छोटा कप
दही - १ छोटा कप, मीठ - चवीनुसार, बारीक चिरलेला कांदा - १ छोटी वाटी, तेल - आवश्यकतेनुसार, तीळ - १ चमचा
सगळ्यात आधी हिरवे मूग स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यात भिजत घाला. . त्यानंतर कांदा बारीक चिरून घ्यावेत.
आता एका मिक्सरच्या भांड्यात भिजवलेले हिरवे मूग, लसूण पाकळ्या, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, कोथिंबीर, रवा, दही आणि मीठ घालून मिश्रण तयार करा. हे मिश्रण वाटून घ्या, पण जास्त बारीक किंवा जाड नको.
तयार मिश्रण एका वाटीमध्ये घेऊन त्यात चिरलेला बारीक कांदा घाला. आपल्याला हवे असल्यास इतर भाज्या देखील घालू शकतो. कांदा व्यवस्थित मिक्स करुन घ्या.
अप्पे पात्राला गॅसवर गरम करायला ठेवा. ग्रीस करुन त्यावर तीळ पसरवा. चमच्याच्या मदतीने तयार सारण अप्पे पात्रात घाला. झाकण झाकून ठेवा.
५ मिनिटानंतर अप्पे दुसऱ्या बाजूने व्यवस्थित फ्राय करुन घ्या. सोनेरी रंग आल्यानंतर काढा. तयार अप्पे हिरव्या चटणी किंवा दहीसोबत खा.