Bharat Jadhav
हिरव्या मिरचीचे लोणचे हे तिखटपणा आणि आंबटपणाच्या अनोख्या मिश्रणासाठी प्रसिद्ध आहे. हिरव्या मिरचीचे लोणचे बनवण्याच्या सोप्या टिप्स जाणून घ्या.
चांगल्या लोणचं करायचं असेल तर चांगले पदार्थ त्यात टाकणं आवश्यक असते. यातील पहिला आणि महत्त्वाचा घटक म्हणजे हिरव्या मिरच्या. मिरच्या निवडताना त्या ताज्या चमकदार आणि किंचित घट्ट असतील अशा घ्या.
मिरच्या घेतल्यानंतर त्या चांगल्या प्रकारे धुवून टाका. त्यानंतर त्या कोरड्या करून घ्या. मिरच्या ओल्या रहिल्या तर त्या खराब होऊ शकतात. दरम्यान लोणचं बनवण्यासाठी मोहरी, बडीशेप, मेथीचे दाणे, हळद, मीठ आणि मोहरीचे तेल हे मुख्य घटक आहेत.
लोणच्याची चव मुख्यत्वे त्याच्या मसाल्यांवर अवलंबून असते. मोहरी, बडीशेप आणि मेथी हलके भाजल्याने त्यांचा सुगंध प्रचंड प्रमाणात वाढतो. त्यांना जाड बारीक पद्धतीनं वाटून घ्या. त्यात हळद, मीठ आणि सुक्या आंब्याच्या पावडर मिसळली जाते. काही लोक लिंबाचा रस देखील घालतात, ज्यामुळे लोणच्याला थोडासा आंबटपणा येतो आणि त्याची चव वाढते.
हिरव्या मिरच्या लांब अशा हलक्या पद्धतीनं कापून घ्या. त्यातील बिया काढून टाका. यामुळे मिरचीला मसाले चांगल्या पद्धतीने लागतात. तयार केलेला मसाला सर्व मिरच्यांमध्ये काळजीपूर्वक भरा.
मसालेदार हिरव्या मिरच्याचं लोणचं कोरड्या काचेच्या बाटलीत साठवाव्यात. काचेच्या बाटल्या लोणच्याची चव बराच काळ टिकवून ठेवतात.
मिरच्या लोणच्यात मोहरीचे तेल टाका . हे तेल केवळ लोणच्याचे आयुष्य वाढवत नाही तर त्याच्या चवी देखील वाढवत असते. तेल पूर्णपणे गरम करून थंड होऊ द्या. यामुळे तेलातील कडूपणा कमी होईल. मिरच्या पूर्णपणे त्यात बुडतील इतकं तेल त्यात टाका. तेलाचा हा थर लोणच्याला खराब होण्यापासून वाचवतो.
मसाले आणि मिरच्या पूर्णपणे एक जीव होण्यासाठी लोणचे ७-१० दिवस उन्हात राहू द्या. त्यादरम्यान बाटली हलवून घेत जा, जेणेकरून सर्व बाजूकडील मिरच्यांना मसाले लागतील.