Surabhi Jayashree Jagdish
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे केवळ पराक्रमी योद्धेच नव्हते तर विद्वान आणि दूरदृष्टी असलेले राज्यकर्तेही होते. त्यांच्या हस्ताक्षरातील दानपत्र आज इतिहासातील अत्यंत मौल्यवान दस्तऐवज मानलं जातं. या पत्रातून त्यांनी आपल्या घराण्याचा इतिहास, हिंदवी स्वराज्याची भूमिका आणि स्वतःचे राज्यधोरण स्पष्ट केले आहे.
२४ ऑगस्ट १६८० रोजी संभाजी महाराजांनी कुडाळ गावातील नामदेवभट्ट यांचे पुत्र आणि सर्व मांत्रिकांमध्ये श्रेष्ठ मानले जाणारे स्वामी बाकरे यांना हे दानपत्र दिलंय. या दानपत्रासोबत महाराजांनी १० हजार सोन्याचे होनही दान स्वरूपात दिलं होतं. हे दानपत्र संस्कृत भाषेत लिहिले गेले असून त्याला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
या पत्रात संभाजी महाराजांनी आपल्या आजोबा शहाजीराजे, वडील छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वतःच्या कार्याचा थोडक्यात उल्लेख केला आहे. त्यांनी आपल्या राज्यधोरणाची आणि स्वराज्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती यात दिली आहे.
संभाजी महाराजांनी या पत्रात पुण्यश्लोक शहाजीराजांचा अत्यंत गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. त्यांनी शहाजीराजांना हिंदुधर्मजीर्णोद्धारक असं संबोधलं आहे. तसंच त्यांच्या धाडसी पराक्रमामुळे आणि हिंदवी स्वराज्याच्या संकल्पामुळे म्लेच्छांच्या विनाशाला सुरुवात झाली, असंही त्यांनी नमूद केलंय.
या दानपत्रात संभाजी महाराजांनी अफजलखान वधाचा विशेष उल्लेख केला आहे. मार्गशीर्ष शुद्ध सप्तमीला झालेल्या या पराक्रमाचे वर्णन त्यांनी अभिमानाने केलं आहे. तसंच शाहिस्तेखानावर शिवाजी महाराजांनी केलेल्या कारवाईचाही उल्लेख या पत्रात आढळतो.
श्रीशिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाच्या सातव्या वर्षी हे दानपत्र तयार करण्यात आले होते. रौद्रनाम संवत्सरातील भाद्रपद शुद्ध पक्षातील चांद्र एकादशीच्या दिवशी सकाळच्या प्रहरी श्रीरघुनाथपंत नारायण अमात्य यांनी या दानपत्रावर लेखनालंकार केला होता. पत्राच्या शेवटी याचा स्पष्ट उल्लेख पाहायला मिळतो.
या पत्रावर महाराजांचा १६ बुरजी पिंपळपानी शिक्का उमटलेला आहे. शिक्क्याखालील दोन ओळींचा मजकूर हा दस्तुरखुद्द संभाजी महाराजांच्या हस्ताक्षरात लिहिलेला असल्याचं मानलं जातं. या मजकुराचा अर्थ “शिवराज पुत्र संभाजी राजे यांनी लिहिलेले मान्य आहे” असा होतो.