Bharat Jadhav
केस धुताना आपण अनेकदा अशा काही चुका करतो ज्यामुळे केस कोरडे आणि कमकुवत होऊ शकतात. या चुकांमुळे टाळूशी संबंधित समस्याही जाणवू शकतात. त्यामुळे केवळ चांगला शॅम्पू वापरणे पुरेसे नाही; त्याचा योग्य प्रकारे वापर करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
अनेकजण घाईघाईत केस फक्त थोडेसे ओले करतात आणि लगेचच शॅम्पू लावतात. यामुळे शॅम्पू केस आणि टाळूवर नीट पसरत नाही. आणि लोक केस खूप जोरात घासू लागतात. हे टाळण्यासाठी, शॅम्पू लावण्यापूर्वी तुमचे केस आणि टाळू पाण्याने पूर्णपणे ओले करा.
काही लोक शॅम्पू लावल्याच्या काही क्षणांतच केस धुतात. तर काही जण तो बराच वेळ तसाच ठेवतात. यापैकी कोणतीही पद्धत सर्व प्रकारच्या शॅम्पूंसाठी योग्य नाहीये. केसांवर शॅम्पू किती वेळ लावून ठेवावा हे त्यातील घटक आणि वापराच्या सूचनांवर अवलंबून असते. त्यामुळे बाटलीवरील सूचना नक्की वाचा.
शॅम्पू करताना आपण अनेकदा केवळ डोक्याच्या वरच्या भागावरच लक्ष केंद्रित करतो. मात्र टाळूचा मागील भाग आणि आजूबाजूचा परिसरही नीट स्वच्छ करणे महत्त्वाचे असते. संपूर्ण टाळूवर शॅम्पू लावा आणि बोटांच्या टोकांनी हलक्या हाताने मालिश करा. नखांनी टाळू जोरात घासू नका. अति घासल्यामुळे टाळूची जळजळ होऊ शकते. आणि केसांच्या मुळांवर अनावश्यक ताण पडू शकतो.
अनेक लोकांचा असा समज आहे की जास्त शॅम्पू वापरल्याने केस अधिक स्वच्छ होतात, परंतु हे नेहमीच खरे नाहीये. अतिप्रमाणात शॅम्पू वापरल्यास तो पूर्णपणे धुवून काढण्यासाठी अधिक पाणी आणि केसांची जोरात चोळामोड करावी लागते, ज्यामुळे केस गळण्याची शक्यता असते. तुमच्या केसांची लांबी आणि गरजेनुसार योग्य प्रमाणातच शॅम्पू वापरावा.
शॅम्पू केल्यानंतर टॉवेलने केस जोरात घासणे ही एक सामान्य चूक आहे. ओल्या केसांची निगा राखताना हलक्या हाताने केस कोरडे करावीत. केसांमधील पाणी काढून टाकण्यासाठी टॉवेलने केसांवर हलका दाब द्यावा. त्याचप्रमाणे, ओले केस जोरात विंचरणेही टाळावे.