Shreya Maskar
उकडीचे मोदक बनवण्यासाठी तांदळाचे पीठ, पाणी, तूप, चिमूटभर मीठ, किसलेला खोबरा, गूळ, वेलची पूड, तूप आणि सुका मेवा इत्यादी साहित्य लागते.
उकडीचे मोदक बनवण्यासाठी सर्वप्रथम एका पातेल्यात थोडे तूप गरम करून खोबरे हलके परतून घ्या. त्यात गूळ घालून मंद आचेवर सतत ढवळत शिजवा.
गूळ विरघळून खोबऱ्यात चांगला मिक्स झाल्यावर आणि मिश्रण थोडे घट्ट झाल्यावर गॅस बंद करा. त्यात वेलची पूड घालून मिश्रण थंड होऊ द्या. सारणात जास्त तूप घालू नका, कारण त्यामुळे मोदकांना आकार देणे अवघड होऊ शकते.
आता एका पातेल्यात पाणी, तूप आणि मीठ एकत्र करा. आच मंद करून, सतत ढवळत हळूहळू तांदळाचे पीठ घाला. मिश्रण एकत्र येऊ लागल्यावर गॅस बंद करा.
मिश्रण कोमट असतानाच, हाताला पाणी किंवा तूप लावून ते चांगले मळून घ्या. पीठ अगदी मऊ झाले पाहिजे. पीठ कोरडे वाटल्यास, मळताना हातांना थोडे कोमट पाणी लावा.
पिठाचा एक छोटा गोळा घ्या आणि बोटांनी दाबून त्याला पातळ, वाटीसारखा आकार द्या. त्यात नारळ-गुळाचे सारण भरा. कडांना लहान चुण्या पाडा, त्या वरच्या बाजूला दुमडा आणि जोडून मोदकाचा आकार द्या.
स्टीमरमध्ये पाणी गरम करा आणि मोदक केळीच्या पानावर किंवा हलके तूप लावलेल्या स्टीमर प्लेटवर ठेवा. सुमारे १०-१५ मिनिटे वाफवा. जेव्हा बाहेरील थर किंचित चमकदार दिसेल आणि मोदक पूर्णपणे शिजतील, तेव्हा मोदक तयार आहेत.
तांदळाच्या पिठाचा थर खूप जाड किंवा खूप पातळ नसावा याची काळजी घ्या. पीठ कोरडे होऊ देऊ नका आणि सारण पूर्णपणे थंड झाल्यावरच वापरा. यामुळे मोदक फुटण्याचा किंवा त्याचा आकार बिघडण्याचा धोका कमी होतो.