Surabhi Jayashree Jagdish
आजकाल वजन वाढण्यामागे फक्त जास्त खाणं कारणीभूत नसतं, तर आपल्या दैनंदिन सवयीही त्यासाठी तितक्याच जबाबदार असतात. नकळत केलेल्या काही छोट्या चुका शरीरात अतिरिक्त कॅलरी वाढवतात.
खाण्याची पद्धत, झोपेची वेळ आणि मानसिक स्थिती यांचा वजनावर थेट परिणाम होतो. त्यामुळे वेळेत या सवयी ओळखून बदल केल्यास वजन नियंत्रणात ठेवणं अधिक सोपं होऊ शकतं.
खाताना टीव्ही, मोबाईल किंवा लॅपटॉपकडे लक्ष असल्यामुळे आपण किती खातोय याची जाणीव राहत नाही. अशावेळी शरीराची पोट भरल्याची सूचना दुर्लक्षित होते आणि गरजेपेक्षा जास्त खाल्लं जातं. ही सवय सतत राहिल्यास अतिरिक्त कॅलरी शरीरात साठून वजन वेगाने वाढू शकतं.
अनेक लोक वेळेअभावी अन्न व्यवस्थित न चावता पटकन खातात. त्यामुळे मेंदूपर्यंत पोट भरल्याचा मेसेज पोहोचायला वेळ लागतो आणि जास्त अन्न खाल्लं जातं. तसंच घाईघाईने खाल्ल्यामुळे पचनक्रियाही बिघडू शकते आणि चरबी साठण्याची शक्यता वाढते.
दुःख, ताण, ब्रेकअप किंवा वाईट आठवणींमुळे अनेक लोक जास्त गोड किंवा जंक फूड खातात. अशा वेळी भूक नसतानाही मन शांत करण्यासाठी खाण्याची सवय लागते. ही इमोशनल ईटिंगची सवय हळूहळू वजन वाढवण्याचं मोठं कारण ठरू शकते.
दररोज पुरेशी झोप न मिळाल्यास शरीरातील भूक नियंत्रित करणारे हार्मोन्स बिघडतात. त्यामुळे सतत भूक लागल्यासारखं वाटतं आणि जास्त खाण्याकडे कल वाढतो. कमी झोपेमुळे शरीराचा मेटाबॉलिझमही मंदावतो, ज्यामुळे वजन कमी करणं कठीण होतं.
अति ताण आल्यावर शरीरात कोर्टिसोल नावाचं हार्मोन वाढतं, जे वजन वाढण्याशी संबंधित मानलं जातं. ताणामुळे गोड, तेलकट आणि जास्त कॅलरी असलेले पदार्थ खाण्याची इच्छा वाढते.