Surabhi Jayashree Jagdish
घोळ भाजी ही पावसाळ्यात नैसर्गिकरीत्या उगवणारी गावरान पालेभाजी आहे. ग्रामीण भागात ही भाजी शेताच्या बांधावर, माळरानावर आणि ओलसर जमिनीत मोठ्या प्रमाणावर आढळते. तिची कोवळी पानं आणि देठ स्वयंपाकासाठी वापरले जातात.
घोळ भाजीमध्ये लोह, कॅल्शियम, तंतुमय घटक आणि विविध जीवनसत्त्वं चांगल्या प्रमाणात आढळतात. ही भाजी पचनक्रिया सुधारण्यास आणि शरीराला पोषकतत्त्वं मिळवून देण्यास मदत करते.
घोळ भाजीतील तंतुमय घटकांमुळे पोट साफ राहण्यास आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होण्यास मदत होते. आयनमुळे रक्तनिर्मितीला आधार मिळतो आणि शरीरातील अशक्तपणा कमी करण्यास हातभार लागू शकतो.
घोळ भाजीची कोवळी पानं स्वच्छ धुऊन बारीक चिरून घ्यावीत. लसूण, हिरवी मिरची, कांदा, शेंगदाण्याचं कूट, मीठ आणि थोडे तेल हे साहित्य तयार ठेवावं. काही भागांत चवीसाठी थोडं बेसन किंवा तांदळाचे पीठही घातलं जातं.
कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, ठेचलेला लसूण आणि हिरवी मिरची घालून फोडणी करावी. त्यानंतर कांदा गुलाबी होईपर्यंत परतून त्यात चिरलेली घोळ भाजी टाकावी. भाजी झाकण ठेवून स्वतःच्या पाण्यात शिजू द्यावी आणि आवश्यकतेनुसार मीठ घालावं.
भाजी अर्धी शिजल्यानंतर त्यात शेंगदाण्याचं कूट घातल्यास चव आणि पौष्टिकता दोन्ही वाढतात. काही ठिकाणी थोडे बेसन घालून भाजीला घट्टपणा दिला जातो. भाजी जास्त शिजवू नये कारण त्यामुळे तिचा नैसर्गिक स्वाद कमी होऊ शकतात.
घोळ भाजी गरमागरम ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीसोबत अतिशय चविष्ट लागते. या भाजीसोबत ठेचा, कांदा आणि ताक दिल्यास पारंपरिक गावरान जेवण पूर्ण होतं.