Surabhi Jayashree Jagdish
लघवीचा रंग गुलाबी, लाल किंवा तपकिरी दिसणं हे लघवीत रक्त असल्याचं लक्षण असू शकतं. हे एकदाच झालं तरी त्याकडे दुर्लक्ष करू नये. कारण त्यामागे किडनी कॅन्सरसह इतरही वैद्यकीय कारणंही असू शकतात.
कंबर किंवा पाठीच्या खालच्या भागात, विशेषतः एका बाजूला सतत वेदना किंवा जडपणा जाणवणं हे तपासण्यासारखं लक्षण आहे. विश्रांती घेतल्यानंतरही त्रास कमी होत नसेल किंवा तो वारंवार जाणवत असेल, तर वैद्यकीय सल्ला घ्यावा.
पुरेशी झोप आणि विश्रांती घेतल्यानंतरही सतत थकवा जाणवत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. थकवा हे अनेक सामान्य आजारांमध्येही दिसणारं लक्षण आहे आणि किडनीशी संबंधित आजारांमध्येही ते आढळू शकते.
आहार किंवा व्यायामाच्या सवयींमध्ये विशेष बदल न करता वजन झपाट्याने कमी होत असेल तर त्याची कारणं शोधणं आवश्यक आहे. किडनी कॅन्सरसारख्या काही गंभीर आजारांमध्ये अनपेक्षित वजन कमी होणं दिसू शकतं. मात्र वजन कमी होण्यामागे इतर अनेक कारणंही असू शकतात.
काही रुग्णांमध्ये भूक पूर्वीपेक्षा कमी होणं आणि दैनंदिन कामांसाठीही ऊर्जा कमी वाटणं असे बदल दिसू शकतात. हे बदल अनेकदा ताण, कामाचा वाढलेला ताण किंवा वयामुळे होत असल्याचं समजून दुर्लक्षित केले जातात.
किडनीतील काही ट्यूमरमधून एरिथ्रोपोइटिन या हार्मोनचं जास्त प्रमाणात उत्पादन होऊ शकतं. त्यामुळे काही रुग्णांमध्ये लाल रक्तपेशींची संख्या वाढून हिमोग्लोबिनची पातळी अनपेक्षितपणे वाढू शकते.
किडनी कॅन्सरच्या सुरुवातीच्या टप्प्यात काही रुग्णांना कोणतीही ठळक लक्षणं जाणवू शकत नाहीत आणि काही ट्यूमर इतर कारणांसाठी केलेल्या स्कॅनमध्ये योगायोगाने आढळतात. धूम्रपान, लठ्ठपणा, अनियंत्रित उच्च रक्तदाब किंवा कुटुंबातील काही वैद्यकीय इतिहास यांसारखे जोखमीचे घटक असल्यास नियमित आरोग्य तपासण्यांबाबत डॉक्टरांचा सल्ला घेणं फायद्याचं असतं.
ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.