Shreya Maskar
तुमच्या छातीत वारंवार दुखत असेल तर ही गोष्ट हलक्यात घेऊ नका, याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. ही फक्त गॅसची समस्य नसून गंभीर आजारांचे लक्षण असू शकते.
हृदयविकाराच्या झटक्याच्या सर्वात सामान्य लक्षणांमध्ये छातीत दुखणे आणि खांदे दुखणे यांचा समावेश आहे. हृदयविकाराच्या झटक्याचे मुख्य कारण धमनीमध्ये अडथळा निर्माण होणे हे आहे. यामुळे हृदयाला पुरेसा रक्तपुरवठा होत नाही, ज्यामुळे छातीत दुखते.
वारंवार छातीत दुखणे हे उच्च रक्तदाबाचे गंभीर लक्षण असू शकते. जेव्हा रक्तदाब खूप जास्त वाढतो, तेव्हा हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांवर ताण पडून छातीत जडपणा, दाब किंवा वेदना जाणवू शकते.
पॅनिक अटॅकच्या वेळी देखील छातीत दुखू शकते. पॅनिक अटॅकमुळे रुग्णांना तणाव, भीती किंवा विचित्र भावनांचा सामना करावा लागतो, ज्यामुळे छातीत दुखणे किंवा चिंता निर्माण होऊ शकते.
गॅस्ट्रोएसोफेजियल रिफ्लक्स डिसीजमध्ये पोटातील आम्ल वारंवार अन्ननलिकेत वर येते, ज्यामुळे छातीत जळजळ, घशात आंबट चव आणि वेदना होतात.
पित्ताशयाच्या समस्या असलेल्या लोकांना वारंवार छातीत दुखते. पित्ताशयातील खड्यांमुळे सुरुवातीला पोटाच्या वरच्या भागात वेदना होऊ शकतात, परंतु हळूहळू त्या खांद्यापर्यंत आणि छातीच्या हाडापर्यंत पसरतात.
पेरिकार्डायटिस म्हणजे हृदयाभोवतीच्या आवरणाची (पेरिकार्डियम) सूज, ज्यामुळे अनेकदा छातीत अचानक आणि तीव्र वेदना होतात. हे विषाणू संसर्ग, हृदयविकाराचा झटका किंवा दुखापतीमुळे होऊ शकते. याचे मुख्य लक्षण म्हणजे झोपल्यावर किंवा खोल श्वास घेतल्यावर वेदना वाढणे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.