Surabhi Jayashree Jagdish
आषाढी एकादशीच्या दिवशी अनेकजण साबुदाणा खिचडी किंवा साधी भगर खाण्याला प्राधान्य देतात. मात्र रोजच्या त्याच चवीला पर्याय म्हणून ताकातली भगर हा उत्तम आणि वेगळा पदार्थ ठरू शकतो.
ताकामुळे भगर मऊशार, रसाळ आणि खायला अधिक रुचकर बनते. ताक पचनास मदत करत असल्याने हा पदार्थ पोटावर ताण आणत नाही. त्यामुळे उपवासात दीर्घकाळ पोट भरल्याची जाणीव राहते आणि थकवाही कमी जाणवतो.
ही रेसिपी तयार करण्यासाठी एक वाटी भिजवलेली भगर, एक वाटी ताक आणि एक वाटी बटाट्याचे तुकडे लागतात. याशिवाय एक चमचा तेल, एक चमचा जिरे, हिरवी मिरची, मिरचीचा ठेचा, दोन चमचे शेंगदाण्याचा कूट, चवीनुसार मीठ आणि आवश्यकतेनुसार पाणी लागतं.
सर्वप्रथम भगर स्वच्छ धुऊन काही वेळ पाण्यात भिजत ठेवा. कढईत तेल गरम करून त्यात जिरं, हिरवी मिरची आणि मिरचीचा ठेचा घालून परता. त्यानंतर बटाट्याचे तुकडे घालून हलकं परता आणि झाकण ठेवून ते किंचित मऊ होईपर्यंत शिजवावं.
बटाटे अर्धवट शिजल्यानंतर त्यात भिजवलेली भगर, शेंगदाण्याचं कूट आणि चवीनुसार मीठ घालून सर्व साहित्य नीट एकत्र करा. त्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी घालून भगर मंद आचेवर शिजू द्या. सुमारे पाच मिनिटांनी भगर फुलू लागल्यावर पुढील टप्पा सुरू करा.
भगर जवळपास शिजल्यानंतर त्यात एक वाटी ताक घाला. ताक घालताना मिश्रण सतत ढवळत राहणे आवश्यक आहे, त्यामुळे ताक फाटत नाही आणि भगरसोबत छान एकजीव होते. त्यानंतर मंद आचेवर झाकण ठेवून आणखी पाच ते सहा मिनिटे वाफ येऊ द्या.
भगर पूर्णपणे मऊ झाल्यावर गॅस बंद करा. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पदार्थाची चव वाढवे. गरमागरम ताकातली भगर दही, लिंबूसोबत टेस्टी लागते.